समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

सोमवार, एप्रिल २६, २०१०

काय वाट्टेल ते - भाग २

आईला तिच्या हातावर माझा छोटुसा हात असा फोटो काढायचा होता पण काहि केल्या माझी बोट सरळ राहीनात म्हणून मग त्या (काय वाट्टेल ते - भाग १) मधल्या पावलाच्या फोटोचा जन्म झाला.
माझ्या गळ्यात ह्या माळा घालुन आता काय बरं कारणार असतिल ही सगळी?
आता असे कोणाचे आंघोळ करताना फोटो काढावेत काय? तरी बरं पाण्यात तरंग उमटले नाहीतर.........
कधि कधि मी अशा पोझ पण देतो.शुक्रवार, एप्रिल २३, २०१०

बू झाला

माझी ही पोस्ट आहे बिनाफोटोची. का? अहो फोटोग्राफर आणि फोटोविषय दोघही ढसाढसा रडत होते मग फोटो कोण काढणार?


थांबा थांबा असं मधुनच नको विस्ताराने सांगतो.


घरातली स्वयंपाकघर ही माझी सगळ्यात आवडती खोली आहे. आई जर काही बनवत असली तर मी जातीनं तिथे हजर असतो.


त्यादिवशी मी मस्त गिरकीचा खेळ खेळत होतो एका स्टिलच्या ५ किलोच्या डब्याशी. डब्याला एका बाजुला हाताने गोल फिरवायचं की तो मस्त गोल फिरतो. छान रमलो होतो मी. आई कढईत काहितरी ढवळत होती. बाबा खाली पार्किंगमध्ये गाडी पुसत होते. माझा खेळ चांगलाच रंगात आला होता, मी एक मस्त मोठी गिरकी दिली डब्याला आणि ’ढाम्म्म्म्म्म’ झालं. एक सेकंद मला कळलच नाही. माझा उजव्या पायाचा अंगठा. पाच किलोचा मोठा स्टिलचा डबा माझ्या उजव्या पायाच्या बोटाच्या अंगठ्यावर. आई जोरात ओरडली आणि मी जोरात भोकाड पसरले.


माज्या अंगठ्याच्या नखामागची स्किन थोडीशी निघाली आणि रक्त येत होते. मला खूप दुखत पण होते आणि आपल्याला काहितरी झाले याची मला भिती पण वाटत होती. हे काय झालं माझ्या पायाला? मी ओक्साबोक्शी रडत होतो. आई मला उचलुन हॉलमध्ये घेवुन गेली. आता मी आईच्या मांडीत झोपुन रडत होतो. आई माझ्या पायाला काहितरी लावण्याचा प्रयत्न करीत होती. मला सांगत होती ’शनु, रडु नको, मी औषध लावते’ पण मी तिला माझ्या पायाला हातही लावुन देत नव्हतो. अजुन जोरात रडणे सुरु केले ते पाहुन मग आईला पण रडु यायला लागले.


तेव्हढ्यात बाबा दार उघडून आत आले, स्वयंपाकघरातुन धुर येत होता, आई आणि मी रडत होतो हे सगळं पाहुन त्यांना समजेना नक्की काय झालयं. जिथुन धुर येत होता तिकडे म्हणजे किचनमध्ये जावुन त्यांनी गॅस बंद केला. मग आमच्याकडे वळुन म्हणाले , काय झालं? तुम्ही दोघं का रडताय?


आई म्हणाली, स्टिलचा डबा आर्यनच्या पायावर पडला. बाबांनी विचारले, मग तु का रडत्येस?
कारण त्याच्या पायाला लागलयं, रक्त येतयं म्हणून. मी त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं नीट.


छे! ही तर सुरुवात आहे, मोठा झाल्यावर बघ किती धडपडेल तो! हे तर काहीच नाही. सोफ्रामायसिन लाव आणि दुदु पण दे त्याला प्यायला. बाबांनी मला उचलुन घेतले आणि आईने दुदु आणुन दिले प्यायला. हळुच औषध पण लावले.


दुदु संपल्यावर मी भोकाड पसरणार तेव्हढ्यात बाबा म्हणाले, चला बाईकवरुन कोण भुर्र येतय फिरायला. माझी लगेच होकारार्थी मान हलायला लागली मग माझे रडणे आपोआप कमी झाले.


जाताना बाबा आईला म्हणाले आता काळ्याकुट्ट रव्याचा उपमा तर बनु शकत नाही तेव्हा मस्त गजाननचा वडापाव आणतो आपल्याला, आईल पण हसायला आले. मी आणि बाबा मस्त बाईकवरुन फिरुन आलो. मला लागलय हे मी विसरुन पण गेलो.


खाताना बाबा म्हणत होते मगाशी तुमचा दोघांचा फोटो काढायला हवा होता एकत्र रडताना आणि दोघही खूप हसले. नंतर कित्येक दिवस मी बू कुठे झाला म्हटलं की उजव्या पायाच्या अंगठ्याकडे बोट दाखवत असे.


आता कळलं, माझी ही पोस्ट बिनाफोटोची आहे कारण, मला "बू झाला"

सोमवार, एप्रिल १९, २०१०

मी पाहिलेले कोकण - २

मागच्या वेळी कोकणरेल्वेचे नुसते रूळ पाहिले तर यावेळी अख्खी कोरे पाहिली. प्रवास करून पाहिली.
आमचा खाबु ग्रुप चालला होता चिपळूणला मावशीच्या ’केळवणासाठी’. बाबा आमच्या ग्रुपमधुन कटाप झाले होते स्वत:हुन.
विंडो सिट असल्यामुळे बाहेर बघायला पण खुप मज्जा येत होती. पनवेल यायच्या आधिच आजीने आणलेली साबुदाण्याची खिचडी आणि थंडगार कोकम सरबत फस्त करुन झाले आमचे. नंतर थोड्या वेळाने बघतो तर काय, एकसे एक छान छान पदार्थ विकायला यायला लागले रेल्वे पॅंट्रीमधुन. आम्हाला तिघांनाही (आई, मावशी आणि मी पण) खुप वाईट वाटले, उगाच पोटभर खिचडी खाऊन घेतली. सामोसा, वडापाव, कांदाभजी, कटलेट, मेदुवडा, असे बरेच खाऊ आम्ही मिस केले. आत्ता नौच वाजलेत अकरा वाजता आपल्याला भुक लागेल मग आपण या पदार्थांकडे पाहुन घेवू असे दोघींनी ठरवले.
थोड्या वेळाने मी झोपुन गेलो कारण पोटात मस्त खिचडी आणि गरम गरम दु दु गेलेले होते, वर खिडकीतुन छान वारा पण लागत होता. जाग आली तेव्हा ट्रेन थांबली होती आणि गडबड गडबड ऐकु येत होती. मावशीचा मेदुवडा खाउन झाला होता आणि आई टोमॅटो सुप पित होती. असे काय काय खाता पिता एकदाचे चिपळूण आले.
घरी पोचतो तर काय पन्ह तयारच होतं. जेवताना पण आंब्याची डाळं, वगैरे मस्त चंगळ होती. आदल्या दिवशीच चैत्रगौरीचे हळदी कुंकु झाले होते असे काकुआजी सांगत होती.
जेवून होते तर मामा आला. त्याने आल्या आल्या स्वत:चा शर्ट काढून टाकला आणि मला पण उघडा केला आणि आईला म्हणाला जरा त्याच्या अंगाला ऊन, हवा लागुदे, तिकडे मुंबईत सारखे कपड्यात गुंडाळलेलेच असता. नंतरचे तिनही दिवस मी नुसती चड्डी घालुनच असायचो कारण मला आईने शर्ट घातला रे घातला की मामा तो काढुन ठेवायचा मग मग आईने पण नाद सोडून दिला.

चिपळूणच्या घरी एक मस्त माउ होतं. मी सारखा त्याच्या मागुन फिरायचो. मला बघितलं की ते पळुन जायचं म्हणून ते झोपल की मी हळुच त्याच्या जवळ जावुन बसायचो. किती मऊ होते ते माउ.
संध्याकाळी आई आणि मी घराजवळच्या हम्मांच्या घरात गेलो खरी खुरी हम्मा बघायला. तिथे चार हम्मा होत्या दोन मोठ्या दोन छोट्या. मी पहिल्यांदा बघितल्या हम्मा. मला आपले माउ आणि भू भू च जास्त आवडतात.
दुसर्‍या दिवशी उठल्यावर पाहिलं मामी अंगण्यात कसली तरी चित्र काढत होती. मी पण जावुन तिला मदत केली.

आज मी एक सगळ्यात मोठं फळ पाहिलं ’फणस’ घराच्या दारातच झाड होतं, माझा हात पोचेल एवढ्या जवळ फणस लागले होते त्याला.
आज दुपारी मावशीचे केळवण झाले. खुपमस्त सजावट केलेली आणि खुप सारे पदार्थ पण होते. आता मी सांगत नाही तुम्हीच बघा,
संध्याकाळी आम्ही डोंगरात फिरायला जावुन आलो. तिथे किती झाडं बघितली आंबा, काजु, फणस, कोकम, जांभुळ, बकुळ. पहिल्यांदा झाडाला लागलेला अननस पाहिला.

नंतर आईच्या आत्याकडे, मावशीकडे, मैत्रिणींकडे, आईच्या शाळेतल्या शिक्षकांकडे असे अनेक जणांच्या घरी जावून खाउन पिउन मज्जा मज्जा करुन आम्ही घरी परत आलो. हे पहा झाडांतून डोकावणारे आमचे चिपळूणचे घर.गुरुवार, एप्रिल १५, २०१०

काय वाट्टेल ते - भाग १आता पावलाचा कोणी फोटो काढत का? पण माझ्या पावलाचा फोटो आहे. मी २० दिवसाचा असतानाचा.


मी झोपल्यावर हे असे माझे काहितरी "बो" वगैरे बांधून पण फोटो काढले जायचे म्हणजे जातात.मला हे असे कपड्यांमधे अडकवून फोटो काढण्यात कसला आनंद मिळतो आहे यांना?


मला कोणीतरी आडवं करा रे! फोटो कसले काढताय?


मी रागावलोय कळलं ना! (फोटोग्राफरवर)


मंगळवार, एप्रिल १३, २०१०

’केळकर गुरुजी’

आई आणि रविनाताईचे आपापसात काहितरी बोलणे झाले. रविनाताई जिला मी ’ता’ म्हणतो, ती प्रचंड खुश झाली. मला कळेना असं आईने हिला काय सांगितलं.


दुसर्‍या दिवशीच मला कळलं, या दोघी माझ्यावरच काहितरी प्रयोग करणार आहेत. त्यांच एकमत होत नव्हत, काय बर करुया ह्याला? कृष्ण करुया, रामदास स्वामी, की दुसरं काहितरी. ता म्हणाली कृष्ण करुया, आईला ते फारसं पटलं नाही कारण मी टोपरं, टोपी, फुलांचा, पुठ्ठ्याचा मुकुट यापैकी काहीही २ सेकंद सुद्धा डोक्यावर टिकुन देत नाही. बिना मोरपिसाच्या कृष्णाची आईला कल्पना करवेना. तसेच हातातली बासरी कंटाळा आला तर मी मधेच कुठेही फेकून देण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे मला कृष्ण बनवण्याची कल्पना कॅन्सल झाली. आता याला काय बनवावा बरे, असा विचार सुरु झाला.तेव्हढ्यात मला नविन आणलेल्या धोतीची आईला आठवण झाली. एकदम खुश हॊऊन ती म्हणाली आपण आर्यनला ’भटजी’ करुया. धोतर आहे, एक जानवं घालुया की झाले ’केळकर गुरुजी’ तयार. ठरलं.बाबांनी या कल्पनेला एकदम तुच्छ ठरवले, पण आईने त्याकडे लक्ष दिले नाही.
मग माझी आजीकडे रोज पाच - दहा मिनीटे प्रॅक्टीस सुरू झाली. धोतर नेसायचे आणि हॉलमध्ये फिरायचे. मजा यायची मला. मी चांगला चालत असे धोतर नेसून. शनू, चाल असे म्हटले की एकदम स्पीडमध्ये चालायला सुरुवात, थांब म्हटले की मी आहे तिथे थांबत असे.


कधिकधि दमून मी असा बसून राही मग मला छान खाऊ दिला जायचा.
मी मधेच भाषण देण्याच्या पावित्र्यात उभा राहून मूक संवाद पण म्हणून दाखवीत असे आणि सगळे टाळ्या पण वाजवायचे.


बाबांना पण प्रॅक्टीसच्या गमती सांगून आईने फोटो दाखवले. फोटो बघून बाबा म्हणाले वा! आर्यन पॉश भटजी आहे, एकदम बॉडीफिट टि-शर्ट वगैरे घातलाय.
आईने सांगितले, मला मिळालेल्या बक्षिसाचे आई, ता आणि मी आईसक्रीम खाणार.
बाबा म्हणाले, नाही! ते पैसे त्याच्या बॅक अकाउंट मधे जमा केले जातील.
आई - त्याच्यावर आम्ही मेहेनत घेत आहोत तेव्हा बक्षिसाचे काय करायचे ते आम्ही ठरवणार.
बाबा - मी आर्यनचा फायनान्स मॅनेजर आहे तेव्हा मी ठरवणार त्याच्या बक्षिसाचे काय करायचे ते.
अशाप्रकारे मला न मिळालेल्या बक्षिसावरून आईबाबांचे भांडण पण झाले.त्यानंतर मधेच कहानीमे एकदम ट्विस्ट आला. कारण आजीने एक फतवा काढला, एवढा लहान माझा नातू त्याला काही स्पर्धेत भाग घ्यायला नकोय. अशाप्रकारे माझी प्रॅक्टीस पण बंद झाली. बरं झालं नाहितरी त्या धोतरात मला अडकल्यासारखच व्हायचं.ता ला मात्र प्रचंड वाईट वाटलं. कारण तिने सोसायटीमधे सगळ्यांना सांगून टाकलं होतं, आमचा आर्यन पण भाग घेणार आहे, वगैरे वगैरे. त्यामुळे मी स्पर्धेत भाग घेणं हा तिच्या प्रेस्टीजचा प्रश्न झाला होता.शेवटी तो दिवस आला. सगळी मुलं काय काय बनली होती कोणी कृष्ण, कोणी विठोबा, कोणी बटाटा, कोणी परी, कोणी न्युज पेपर, कोनी नवरी, कोणी नेता. मी कोणीच नाही बनणार म्हणून ता खूप दु:खी झाली होती. प्रेक्षकांत बसलेले असतानाच ती आईला म्हणाली चला ना आपण आर्यनला भटजी करूया. बहुतेक आईला पण वाटल, आपल्या मुलाने स्टेजवर बागडावं.

ता ने धावत जाउन माझे वेषभूषेचे सामान आणले. पाच मिनिटात मला धोतर नेसवण्यात आलं आणि जानवं गळ्यात घालून मी आईबरोबर स्टेजवर कधि पोचलो ते मला कळलं सुद्धा नाही.
माझा स्टेज पफॉरमन्स पहायचाय, हा बघा,


मंगळवार, एप्रिल ०६, २०१०

मी पाहिलेले कोकण - १

दोन मोठ्या बॅग्ज हॉलमध्ये ठेवलेल्या होत्या. म्हणजे नक्कीच आम्ही कुठेतरी जाणार आहोत. रात्री झोपताना बाबांनी आईकडून सकाळी लवकर उठण्याचे कबुल करून घेतले कारण जर निघायला उशिर केला तर खूप ट्राफिक लागेल आणि मग ड्रायव्हिंगचा आनंद घेता येणार नाही. नंतर लगेच आईने माझ्याकडून कबुल करून घेतले, शनू सकाळी लवकर उठायचे, रडायचे नाही. आपण कोकणात फिरायला जाणार आहोत.

बरेच प्रश्न मनात आले, कोकण म्हणजे काय? आम्ही तिकडे का जातोय? पण मग मला आठवले बाबा आईला नेहेमी हाक मारतात ’ओ कोकणी माणसांनो’, या सगळ्यात मला पटकन झोप लागली.

कबुल करून घेतल्याप्रमाणे आईने मला पहाटे पहाटे उठवले, आंघोळ न घालताच मला पावडर लावून टि-शर्ट आणि फुल चड्डी घातली, मी तयार झालो सुद्धा. बाबा मला सांगत होते, आर्यन ही तुझी दुसरी लॉंग ड्राईव्ह.

मस्त वाटत होते गार हवा, रस्त्यावर कमी गर्दी. आम्ही साधारण नऊ वाजताच वडखळला पोचलो. लवाट्यांकडे मस्तपैकी मिसळपाव आणि गरम गरम बटाटेवडे हादडले बाकिच्यांनी. मी ईडली चटणी. नंतर बाबांनी जी गाडी सुरू केली ती डायरेक्ट महाडला नेवून थांबवली. आई महाडला लहानपणीची काही वर्षे राहिले होती. तेव्हाचे ती रहात असलेले भाड्याचे घर, तिची शाळा, फेव्हरेट बेकरी असे काय काय बघत आम्ही विन्हेरला पावणेबाराला पोचलो. विन्हेरे हे एक खेडेगाव आहे महाड तालुक्यातले. तिथे आईची मावशी रहाते.
तिथे पोचल्या पोचल्या मला चांगला प्रसाद मिळाला. मी आणि बाबा घराच्या पायर्‍यांवर बसलो होतो. माझ्या पायात सॉक्स होते त्यामुळे पटकन माझा पाय घसरला आणि मी तिसर्‍या पायरीवरून डायरेक्ट जमिनीवर येवून पडलो. माझ्या ओठाला आणि हनुवटीला थोडेसे लागले. आई बाबांवर रागावली त्यांनी माझ्यावर नीट लक्ष न ठेवल्याने मी पडलो म्हणून आणि बाकीचे सगळे आईवर रागावले, बारिकश्या खरचटण्याचा एव्हढा बाऊ केल्यामुळे.

मावशी आजीचे घर खूप मोठे आहे. भरपूर खोल्या, मागे पुढे आंगण, घराच्या शेजारीच छोटीशी नदी, आजुबाजूला भरपूर आंबा, फणस, चिकू अशी झाडं. मी पहिल्यांदा झाडावर लागलेला चिकू पाहिला.

संध्याकाळी आम्ही जवळच फिरून आलो, कोकण रेल्वेचे रूळ बघितले. दिवसभर खूप खेळून, फिरून रात्री लवकर झोपून गेलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी नाष्टा करून आम्ही बाहेर पडलो आणि आलो दापोलीला. जिथे आईचा मामा रहातो, माझे मामाआजोबा. त्यांचे घर पण मावशीआजी सारखेच होते थोडे फार. मोठे घर, आंगण, सुपारी, दालचीनी, जायफळ, अशी झाडे. मामाआजोबांकडे मनीमाऊ पण होती दोन दोन. एक छोटे पिल्लू आणि त्याची आई. ते पिल्लू माझ्या मांडीत पण येवून बसले होते. मला खूप आवडले ते. पण मी त्याला हातात धरल्यावर ते पटकन उडी मारून पळून गेले. मग मी खूप वेळ रडलो. दुपारी जेवून आराम करून संध्याकाळी आम्ही दाभोळला आलो. तिथे आम्ही आमच्या गाडीसकट फेरीमध्ये बसलो आणि पंधरा मिनिटात दाभोळमधून गुहागरला पोचलो. फेरीबोटीत खूप मज्जा आली.

गुहागरला पोचल्या पोचल्या आम्ही लगेच समुद्रावर गेलो. मी समुद्र कधिच पाहिला नव्हता, एव्हढे सगळे पाणी, खळखळ आवाज करत आमच्या दिशेने येणार्‍या लाटा बघून माझी जाम घाबरगुंडी उडाली. आईने माझ्यासाठी मारे बिचवेअर चड्डी आणली होती, हौशीने मला घातली सुद्धा. पण मला काही हा समुद्र नावाचा प्रकार बिलकुल पसंत पडला नव्हता. मी वाळूवर पाय सुद्धा टेकायला तयार नव्हतो तरी मला उभे केले आणि असा रडका फोटो पण काढला.

शेवटी नाईलाजाने मला घेवून सगळे बाहेर आले, मला नेहेमीचे कपडे सुद्धा घातले. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. मग आम्ही दुर्गादेवी आणि व्याडेश्वराचे दर्शन घेवून चिपळूणच्या दिशेने प्रवास सुरू केला. आम्ही रात्री ९ वाजता चिपळूणला पोचलो. मी गाडीतच झोपुन गेल्याने मला हे दुसर्‍या दिवशी कळले. सकाळी छान थंडी होती बाहेर, झाडांवर वेगवेगळे पक्षी ओरडत होते.

चिपळूणच्या घराच्या मागेच डोंगर आहे. तिथेतर ढगच खाली आले होते. आईने सांगितले, ते धुकं आहे. पण मला वाटतं ते ढगच होते. मी आणि आई चुलीजवळ बसलो होतो, शेकायला. आई चुलितल्या ज्वाळांवर हात धरायची आणि चेहेरा, हात, पायांवर हात ठेवायची, मस्त गरम गरम वाटायचे.

सकाळी थोडे इकडे तिकडे करून आम्ही रत्नागिरी जवळच्या सोमेश्वर गावातले आमचे कुलदैवत ’देव सोमेश्वर’ आणि ढोकमळे गावातील आमची कुलदेवता ’बंदिजाई देवी’ यांचे दर्शन घेवून आलो.

आईबाबांना जास्त सुट्टी नसल्याने दुसर्‍या दिवशी आमची परतिच्या प्रवासाला सुरुवात झाली. आई आणि मी परत चिपळूणला जायचे ठरवले आहे, कारण तिथे आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही म्हणून.

गुरुवार, एप्रिल ०१, २०१०

अंतर्मुख!मनात खूप गोष्टी आहेत, कुठली सांगु आणि कुठली नको असे झाले आहे मला. जरा विचार करतो आणि मग लिहितो बर का!