समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

गुरुवार, मे २७, २०१०

लग्न आणि गाडी

मागचे दोन आठवडे खूप खूप बिझि गेले. ब्लॉगर्स स्नेहमेळावा संपल्यानंतर मी माझ्या मावशीच्या लग्नाच्या तयारीला लागलो.
आई सकाळी ऑफिसला गेली की आजी, रविनाताई आणि मी कामाला लागायचो. पापड केले, रंगित फेण्या केल्या, गव्हले बनवले. किती मजा आली मला. मी माझ्यापरीने त्यांना मदत करायचो जसे, पापडाची लाटी परत कुटणे, फेण्यांचा साबुदाणा चमच्याने ढवळणे, मी गव्हले चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करायचो पण ते यायचे नाहीत चिमटीत. खूपच छोटे होते ते. आजी लाडू वळायला बसली की मी लगेच चव बघायला तिथे हजर व्हायचो.
मी दुपारी झोपलो की आजी आणि रविनाताई करंज्या, अनरसे वगैरे माझी मदत नको असलेले पदार्थ करून घ्यायचे.
लग्नाच्या आदल्या दिवशी आई आणि मी मिळून रुखवतावर मांडायच्या सर्व पदार्थांचे नीट पॅकिंग केले. बॉक्समध्ये भरून पण ठेवले.


घरी पाहुणे आलेले सगळे माझे लाड करायचे, उचलून भूर्र न्यायचे, खाऊ द्यायचे त्यामुळे खूप मजा येत होती.
दुसर्‍या दिवशी म्हणजे मावशीच्या लग्नाच्या दिवशी सकाळी सव्वा पाच वाजता मी उठलो. दुदु पिउन झाल्यावर बाबांनी मला आंघोळ घातली. आईने मला लग्नासाठी खास शेरवानी ड्रेस आणला होता, त्याला छान ओढणी पण होती.

लग्नाचा हॉल एसी असल्यामुळे अजिबात गरमा झाला नाही. मी खूप हॉलभर मस्त हुंसडलो, खूप धमाल केली. रोजच्यासारखी दुपारची झोप पण काढली तिथे सोफ्यावर.

मावशीच्या लग्नात मी एक गंमत पाहिली. माझे होणारे काकांना लग्नमंडपात घेवून येताना एक वेगळेच वाद्य वाजवले त्या मिशीवाल्या काकांनी. आईने सांगितले त्याला तुतारी म्हणतात. मस्त आवाज यायचा त्याचा. मग मावशीला आणताना पण त्या काकांनी तुतारी वाजवुन वाजत गाजत मंडपात आणले. बाबांना आणि मला फार फार आवडली तुतारी.
मावशीच्या लग्नाची गडबड संपते ना संपते तो दुसर्‍या दिवशी अक्षयतृतीया आली. मला आत्याच्या नविन गाडीची डिलीव्हरी घ्यायला जायचे होते. तिथे सगळ्या फॉर्म्यालिटीज पूर्ण व्ह्यायला बराच वेळ गेला पण शोरूममध्ये एक मस्त छोटीशी घसरगुंडी होती, बॉल होता, छोटे टेबल आणि खुर्च्या होत्या. मी खूप मस्ती केली, खेळलो तिथे.
मग एका मोठ्या फुग्याला सायलीताईने टाचणी लावून फोडले, त्यातुन मस्त चकमक आणि थर्माकॉलचे छोटे बॉल पडले आमच्या अंगावर पडले. मोठ्या स्पिकरवर ’Congradulations' असे गाणे लावले आणि कारच्या कीज आम्हाला दिल्या.


आत्याने गाडीची पुजा केली, मग काजुकतली दिली सगळ्यांना, मी दोन खल्ल्या.
मग नविन गाडीने आम्ही आत्याला, काकांना आणि सायलीताईला डोंबिवलीला सोडून आलो.
नविन गाडीने आम्ही मस्त फिरायला पण जावून आलो पण त्याबद्दल मी पुढच्यावेळी लिहीन.

सोमवार, मे १०, २०१०

९ मे २०१० @ दासावा

दुपारी दोन ते चार ही माझी झोपेची वेळ आहे. त्यामुळे माझे कपडे कधी बदलले, रोहनदादाच्या गाडीत कसा बसलो आणि दासावा मधे केव्हा पोचलो ते कळलेच नाही. जाग आली तेव्हा दासावाच्या पायर्‍या चढत होतो बाबांच्या हातावर बसुन.आम्ही साधारण सव्वाचारला पोचलो. तिथे दारातच महेंद्रकाका उभे होते, काही दादा आणि एक ताई पण होती कांचनताई. पण माझी त्याच्याशी ओळख नव्हती. त्यांनी मला बरोबर ओळखले. सचिनदादाने एक बॅच दिला आईला, नाव आणि नंबर लिहिलेला. मला पण बॅच हवा होता म्हणून आईने तो माझ्या शर्टला लावला.


आई, बाबा आणि मी पहिल्या रांगेत जाउन बसलो. मी लगेच एक बाटली दुदु पिउन घेतले, मला बरं वाटलं. आमच्याबरोबर रोहनदादाची बायको शमिका होती. तिच्या टच स्क्रिन फोनबरोबर मी खूप खेळलो. त्याच्यामुळे माझी आणि तिची चांगली मैत्री झाली.


हळुहळु सगळे यायला सुरुवात झाली. अमेरिकेची अपर्णाताई आली तिने मला खाऊ दिला आणि एक छोटीशी डबी दिली आहे पण त्यात काय आहे ते मला अजुन कळले नाहीये. मग श्रेयाताई आल्या त्यांनी एक गोळी देउन माझ्याशी दोस्ती केली.


थोड्या वेळाने मी आणि आई मागे गेलो जिथे पुण्याचा सागरदादा, हैद्राबादचा आनंददादा, भारतदादा, देवेंद्रदादा या सगळ्यांना भेटलो.


मधेच एक मुलगी आमच्या इथे आली आणि तिने माझा पापा घेतला. आईला वाटले कोणत्यातरी ब्लॉगरकाकांबरोबर आलेली त्यांची मुलगी असेल तर ती चक्क ’मैथिली थिंक्स’ हा ब्लॉग लिहीणारी माझी मैथिलीताई होती. मी माझ्या ब्लॉगचे विजेटकोड बनवुन देणार्‍या सलिलदादाला पण भेटलो. त्याला फोटोसाठी छान छान पोझ पण दिल्या.कांचनताईने कार्यक्रमाला सुरुवात केली, स्वतःची ओळख करुन दिली. मग प्रत्येक जण आपापली माहिती सांगत होते. माझ्या मनातलं सगळं आईने सांगितलं. स्टेजवर असतानाच महेंद्राकाकांनी सगळ्यात ’लहान’ ब्लॉगर म्हणून मला एक ’मोठी’ कॅडबरी दिली. मला महेंद्रकाका खूप आवडतात.थोड्या वेळाने बटाटेवडा कटलेट असा खाऊ आला. कटलेटचा तुकडा मी खाउन बघितला पण तिखट लागला मला म्हणून मी शमिकाच्या टच स्क्रिनबरोबर खेळायला गेलो. सगळे ताई, दादा, काका, आणि आजोबा स्वतःची ओळख करुन देत होते. आई ऐकत होती. मला जरा कंटाळा आला तेव्हा मी शमिका बरोबर मागे एक फेरी मारून आलो. महेंद्रकाकांच्या डिशमधला थोडासा बटाटावडा पण खल्ला. मला खुप मजा आली दासावामध्ये.


सगळ्यांना टाटा केला, फ्लाईंग किस दिला आणि आम्ही तिथुन थोडे लवकरच निघालो. येताना रोहनदादा बरोबर आल्यामुळे जाताना बसने घरी गेलो. विंडोसिट मिळाली होती मला मस्त झोप लागली. बसमधुन उतरुन आम्ही रिक्षेत बसल्यावर बाबांच्या लक्षात आले माझ्या एका पायात बुट नाहिये. आता कुठे शोधणार? बसमधे, रस्त्यात कुठे पडला कुणास ठाउक?

माझा आवडता बुट्टु हरवला :(

आई म्हणत होती सिंड्रेलाचा बुट्टु पण असाच हरवला होता आणि तो कोणीतरी शोधत शोधत तिला आणुन दिला, माझा पण बुट्टु असा कोणी परत आणुन दिला तर कित्ती बरं होईल.