समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

कोकण प्रवास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कोकण प्रवास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, एप्रिल १९, २०१०

मी पाहिलेले कोकण - २

मागच्या वेळी कोकणरेल्वेचे नुसते रूळ पाहिले तर यावेळी अख्खी कोरे पाहिली. प्रवास करून पाहिली.
आमचा खाबु ग्रुप चालला होता चिपळूणला मावशीच्या ’केळवणासाठी’. बाबा आमच्या ग्रुपमधुन कटाप झाले होते स्वत:हुन.
विंडो सिट असल्यामुळे बाहेर बघायला पण खुप मज्जा येत होती. पनवेल यायच्या आधिच आजीने आणलेली साबुदाण्याची खिचडी आणि थंडगार कोकम सरबत फस्त करुन झाले आमचे. नंतर थोड्या वेळाने बघतो तर काय, एकसे एक छान छान पदार्थ विकायला यायला लागले रेल्वे पॅंट्रीमधुन. आम्हाला तिघांनाही (आई, मावशी आणि मी पण) खुप वाईट वाटले, उगाच पोटभर खिचडी खाऊन घेतली. सामोसा, वडापाव, कांदाभजी, कटलेट, मेदुवडा, असे बरेच खाऊ आम्ही मिस केले. आत्ता नौच वाजलेत अकरा वाजता आपल्याला भुक लागेल मग आपण या पदार्थांकडे पाहुन घेवू असे दोघींनी ठरवले.
थोड्या वेळाने मी झोपुन गेलो कारण पोटात मस्त खिचडी आणि गरम गरम दु दु गेलेले होते, वर खिडकीतुन छान वारा पण लागत होता. जाग आली तेव्हा ट्रेन थांबली होती आणि गडबड गडबड ऐकु येत होती. मावशीचा मेदुवडा खाउन झाला होता आणि आई टोमॅटो सुप पित होती. असे काय काय खाता पिता एकदाचे चिपळूण आले.
घरी पोचतो तर काय पन्ह तयारच होतं. जेवताना पण आंब्याची डाळं, वगैरे मस्त चंगळ होती. आदल्या दिवशीच चैत्रगौरीचे हळदी कुंकु झाले होते असे काकुआजी सांगत होती.
जेवून होते तर मामा आला. त्याने आल्या आल्या स्वत:चा शर्ट काढून टाकला आणि मला पण उघडा केला आणि आईला म्हणाला जरा त्याच्या अंगाला ऊन, हवा लागुदे, तिकडे मुंबईत सारखे कपड्यात गुंडाळलेलेच असता. नंतरचे तिनही दिवस मी नुसती चड्डी घालुनच असायचो कारण मला आईने शर्ट घातला रे घातला की मामा तो काढुन ठेवायचा मग मग आईने पण नाद सोडून दिला.

चिपळूणच्या घरी एक मस्त माउ होतं. मी सारखा त्याच्या मागुन फिरायचो. मला बघितलं की ते पळुन जायचं म्हणून ते झोपल की मी हळुच त्याच्या जवळ जावुन बसायचो. किती मऊ होते ते माउ.
संध्याकाळी आई आणि मी घराजवळच्या हम्मांच्या घरात गेलो खरी खुरी हम्मा बघायला. तिथे चार हम्मा होत्या दोन मोठ्या दोन छोट्या. मी पहिल्यांदा बघितल्या हम्मा. मला आपले माउ आणि भू भू च जास्त आवडतात.
दुसर्‍या दिवशी उठल्यावर पाहिलं मामी अंगण्यात कसली तरी चित्र काढत होती. मी पण जावुन तिला मदत केली.

आज मी एक सगळ्यात मोठं फळ पाहिलं ’फणस’ घराच्या दारातच झाड होतं, माझा हात पोचेल एवढ्या जवळ फणस लागले होते त्याला.
आज दुपारी मावशीचे केळवण झाले. खुपमस्त सजावट केलेली आणि खुप सारे पदार्थ पण होते. आता मी सांगत नाही तुम्हीच बघा,
संध्याकाळी आम्ही डोंगरात फिरायला जावुन आलो. तिथे किती झाडं बघितली आंबा, काजु, फणस, कोकम, जांभुळ, बकुळ. पहिल्यांदा झाडाला लागलेला अननस पाहिला.

नंतर आईच्या आत्याकडे, मावशीकडे, मैत्रिणींकडे, आईच्या शाळेतल्या शिक्षकांकडे असे अनेक जणांच्या घरी जावून खाउन पिउन मज्जा मज्जा करुन आम्ही घरी परत आलो. हे पहा झाडांतून डोकावणारे आमचे चिपळूणचे घर.



मंगळवार, एप्रिल ०६, २०१०

मी पाहिलेले कोकण - १

दोन मोठ्या बॅग्ज हॉलमध्ये ठेवलेल्या होत्या. म्हणजे नक्कीच आम्ही कुठेतरी जाणार आहोत. रात्री झोपताना बाबांनी आईकडून सकाळी लवकर उठण्याचे कबुल करून घेतले कारण जर निघायला उशिर केला तर खूप ट्राफिक लागेल आणि मग ड्रायव्हिंगचा आनंद घेता येणार नाही. नंतर लगेच आईने माझ्याकडून कबुल करून घेतले, शनू सकाळी लवकर उठायचे, रडायचे नाही. आपण कोकणात फिरायला जाणार आहोत.

बरेच प्रश्न मनात आले, कोकण म्हणजे काय? आम्ही तिकडे का जातोय? पण मग मला आठवले बाबा आईला नेहेमी हाक मारतात ’ओ कोकणी माणसांनो’, या सगळ्यात मला पटकन झोप लागली.

कबुल करून घेतल्याप्रमाणे आईने मला पहाटे पहाटे उठवले, आंघोळ न घालताच मला पावडर लावून टि-शर्ट आणि फुल चड्डी घातली, मी तयार झालो सुद्धा. बाबा मला सांगत होते, आर्यन ही तुझी दुसरी लॉंग ड्राईव्ह.

मस्त वाटत होते गार हवा, रस्त्यावर कमी गर्दी. आम्ही साधारण नऊ वाजताच वडखळला पोचलो. लवाट्यांकडे मस्तपैकी मिसळपाव आणि गरम गरम बटाटेवडे हादडले बाकिच्यांनी. मी ईडली चटणी. नंतर बाबांनी जी गाडी सुरू केली ती डायरेक्ट महाडला नेवून थांबवली. आई महाडला लहानपणीची काही वर्षे राहिले होती. तेव्हाचे ती रहात असलेले भाड्याचे घर, तिची शाळा, फेव्हरेट बेकरी असे काय काय बघत आम्ही विन्हेरला पावणेबाराला पोचलो. विन्हेरे हे एक खेडेगाव आहे महाड तालुक्यातले. तिथे आईची मावशी रहाते.
तिथे पोचल्या पोचल्या मला चांगला प्रसाद मिळाला. मी आणि बाबा घराच्या पायर्‍यांवर बसलो होतो. माझ्या पायात सॉक्स होते त्यामुळे पटकन माझा पाय घसरला आणि मी तिसर्‍या पायरीवरून डायरेक्ट जमिनीवर येवून पडलो. माझ्या ओठाला आणि हनुवटीला थोडेसे लागले. आई बाबांवर रागावली त्यांनी माझ्यावर नीट लक्ष न ठेवल्याने मी पडलो म्हणून आणि बाकीचे सगळे आईवर रागावले, बारिकश्या खरचटण्याचा एव्हढा बाऊ केल्यामुळे.

मावशी आजीचे घर खूप मोठे आहे. भरपूर खोल्या, मागे पुढे आंगण, घराच्या शेजारीच छोटीशी नदी, आजुबाजूला भरपूर आंबा, फणस, चिकू अशी झाडं. मी पहिल्यांदा झाडावर लागलेला चिकू पाहिला.

संध्याकाळी आम्ही जवळच फिरून आलो, कोकण रेल्वेचे रूळ बघितले. दिवसभर खूप खेळून, फिरून रात्री लवकर झोपून गेलो.

दुसर्‍या दिवशी सकाळी नाष्टा करून आम्ही बाहेर पडलो आणि आलो दापोलीला. जिथे आईचा मामा रहातो, माझे मामाआजोबा. त्यांचे घर पण मावशीआजी सारखेच होते थोडे फार. मोठे घर, आंगण, सुपारी, दालचीनी, जायफळ, अशी झाडे. मामाआजोबांकडे मनीमाऊ पण होती दोन दोन. एक छोटे पिल्लू आणि त्याची आई. ते पिल्लू माझ्या मांडीत पण येवून बसले होते. मला खूप आवडले ते. पण मी त्याला हातात धरल्यावर ते पटकन उडी मारून पळून गेले. मग मी खूप वेळ रडलो. दुपारी जेवून आराम करून संध्याकाळी आम्ही दाभोळला आलो. तिथे आम्ही आमच्या गाडीसकट फेरीमध्ये बसलो आणि पंधरा मिनिटात दाभोळमधून गुहागरला पोचलो. फेरीबोटीत खूप मज्जा आली.

गुहागरला पोचल्या पोचल्या आम्ही लगेच समुद्रावर गेलो. मी समुद्र कधिच पाहिला नव्हता, एव्हढे सगळे पाणी, खळखळ आवाज करत आमच्या दिशेने येणार्‍या लाटा बघून माझी जाम घाबरगुंडी उडाली. आईने माझ्यासाठी मारे बिचवेअर चड्डी आणली होती, हौशीने मला घातली सुद्धा. पण मला काही हा समुद्र नावाचा प्रकार बिलकुल पसंत पडला नव्हता. मी वाळूवर पाय सुद्धा टेकायला तयार नव्हतो तरी मला उभे केले आणि असा रडका फोटो पण काढला.

शेवटी नाईलाजाने मला घेवून सगळे बाहेर आले, मला नेहेमीचे कपडे सुद्धा घातले. तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला. मग आम्ही दुर्गादेवी आणि व्याडेश्वराचे दर्शन घेवून चिपळूणच्या दिशेने प्रवास सुरू केला. आम्ही रात्री ९ वाजता चिपळूणला पोचलो. मी गाडीतच झोपुन गेल्याने मला हे दुसर्‍या दिवशी कळले. सकाळी छान थंडी होती बाहेर, झाडांवर वेगवेगळे पक्षी ओरडत होते.

चिपळूणच्या घराच्या मागेच डोंगर आहे. तिथेतर ढगच खाली आले होते. आईने सांगितले, ते धुकं आहे. पण मला वाटतं ते ढगच होते. मी आणि आई चुलीजवळ बसलो होतो, शेकायला. आई चुलितल्या ज्वाळांवर हात धरायची आणि चेहेरा, हात, पायांवर हात ठेवायची, मस्त गरम गरम वाटायचे.

सकाळी थोडे इकडे तिकडे करून आम्ही रत्नागिरी जवळच्या सोमेश्वर गावातले आमचे कुलदैवत ’देव सोमेश्वर’ आणि ढोकमळे गावातील आमची कुलदेवता ’बंदिजाई देवी’ यांचे दर्शन घेवून आलो.

आईबाबांना जास्त सुट्टी नसल्याने दुसर्‍या दिवशी आमची परतिच्या प्रवासाला सुरुवात झाली. आई आणि मी परत चिपळूणला जायचे ठरवले आहे, कारण तिथे आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही म्हणून.