समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

मंगळवार, ऑक्टोबर ०५, २०१०

घोलवड - सावे फार्म

आत्या - काका, आई - बाबा आणि सायलीताई - मी असे सगळे मिळून एका छोट्याश्या ट्रिपला जायचं ठरलं. आत्याच्या नविन गाडीतुन.
बरीच शोधाशोध केल्यावर घोलवडला सावे फार्मला जायचं नक्की झालं.
जायच्या दिवशी सकाळी सगळ्यांबरोबर लवकर उठून बसलो, आईने पटापट मला तयार केलं. बाबांना ड्रायव्हिंगची प्रचंड आवड आहे. सकाळी लवकर निघालो की ट्राफिक पण कमी लागते म्हणून बाबांनी आम्हाला बरोबर सात वाजायच्या आत घराबाहेर काढले.आम्ही घोडबंदर रोड, मुंबई - अहमदाबाद रोड असे करत घोलवडला पोचलो.सावे फार्ममध्ये शिरल्याबरोबर मी इकडे तिकडे धावायला सुरुवात केली. आमच्या खोल्यांच्या आजुबाजुला मोठी मोठी झाडे होती आंबे, नारळ, जांब, स्टारफ्रुट,इ. आईने एका लांब काठीने जांब पाडले. मस्त होते चवीला. मोकळ्या पॅसेजमध्ये छान झोपाळा होता, सी सॉ होते, हॅमॉक पण होते.
आजुबाजुला ससे, कासव, माऊ, भू भू, माकडं असे प्राणी होते.
मस्त मजा येत होती. खोल्या पण छान होत्या. त्यांच्या भिंतींना बाहेरुन वारली पेंटिंग केले होते.

















दुपारी झोपुन उठल्यावर आम्ही जवळच्या बोर्डीच्या समुद्रावर गेलो फिरायला. चक्क यावेळी मी समुद्राला अजिबात घाबरलो नाही. मी एकटक त्याच्याकडे पहात होतो. मऊ मऊ वाळूत खेळायला पण खूप मज्जा आली. मी बिस्कीट खात असताना एक भू भू माझ्यामागे लागला. शेवटी त्याला पण बिस्कीट दिले तेव्हा गेला तिथुन.
रात्री गरम गरम पोळ्या, कोशिंबीर, दोन दोन भाज्या, चिकूचे लोणचे, पापड, आमटी भात, गुलाबजामुन असे जेवून सगळी गप्पा मारत बसली बराच वेळ. मी आपला झोपुन गेलो कारण दुसर्‍या दिवशी सावेंचे मोठे फार्म (३५ एकर्स) बघायला जायचे होते ना!
दुसर्‍या दिवशी सकाळी दुदु पिवून मी तयार पण झालो सगळ्याच्या आधी. मग काका आणि मी अंगणात पकडा पकडी खेळलो.
तिथे एक वेगळीच गाडी दिसली जिच्या सिट्स बांबूच्या पट्ट्यांच्या होत्या आणि छोटेसे इंजिन होते गाडी चालवायला. त्या गाडीला ’तारपा’ असे नाव होते. तारप्यामधे बसून आम्ही फार्मच्या बरेच आंत फिरलो.
शेकडो चिकूची, लिचीची झाडे, आंब्याची कलमे, अ‍ॅव्होकॅडो, युरोप फिग, दालचिनी/ तमालपत्र, वेलची, कॉफी अशी झाडे, विविध औषधी वनस्पती, कॅकटस गार्डन, फुलझाडे तसेच एक छोटेसे कृषीप्रदर्शन अशा अनेक गोष्टी बघितल्या. फार्मच्या मधोमध एक प्रचंड तलाव बांधला आहे. त्यात पावसाचे पाणी साठवून ठेवले जाते, उन्हाळ्यात पाणी टंचाई नको म्हणून.
ऊन खूप लागत होते पण मला डोक्यावर टोपी रुमाल वगैरे अजिबात आवडत नाही म्हणून मी टोपी घालत नव्हतो पण आईने सांगितले की जर मी टोपी घातली नाही तर वाघ येईल आणि मला घेवून जाईल, त्यामुळे नाईलाजाने घालावी लागली.
तिथुन आम्हाला अ‍ॅडव्हेंचर कॅंपच्या ठिकाणी नेले. मी एकदम वेगळ्याच गोष्टी पाहील्या तिथे. रोप क्लायबिंग, टायरमधला झोपाळा, मचाण, दोरीची शिडी अशा विविध अ‍ॅक्टीव्हिटीज होत्या तिथे.

तिकडे फिरून येइ पर्यंत ११ वाजले आणि गरम पण खूप होत होते. त्यामुळे सगळी स्मिमिंग पूल कडे वळली.
मी पाण्याला प्रचंड घाबरायचो त्यामुळे मी स्वतः पण पाण्यात जात नव्हतो आणि आई बाबांना पण जाऊन देत नव्हतो. तर सरळ बाबा वरती आले आणि त्यांनी मला उचलुन घेवुन सरळ पाण्यात नेवून बुडवले. थोडा वेळ रडलो पण मग मज्जा आली मला.

दुपारचे एक वाजेपर्यंत पाण्यात मनसोक्त डुंबल्यावर सगळी जण बाहेर आली. टेस्टी गरम गरम जेवण जेवून, थोडीशी झोप काढली आम्ही. तिथून चहा घेवून जे निघालो ते डायरेक्ट ठाण्याला येवून थांबलो. येतानाच पुन्हा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये परत जायचा प्लान केला आहे.