समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

शुक्रवार, जानेवारी २९, २०१०

बोरनहाण

आई फोनवर काकुला सांगत होती, 'उद्या या हं आर्यनचे बोरनहाण आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या, मग आर्यनला हलव्याचे दागिने घालु आणि सुरु करु.'
संध्याकाळी या, आर्यनला हलव्याचे दागिने घालु वगैरे ऐकले आणि वाटलं परत बारसं आहे वाटतं माझं. असा विचार करत असतानाच झोप लागली.
दुसरा दीवस सुरु झाला, घरात गडबड सुरु होतीच, खाद्यपदार्थांचे छान छान वास येत होते. मला आई बाबांनी छान काळा ड्रेस आणला होता, त्याच्यावर आईस क्रीम चे चित्र होते, चांदण्या होत्या. मला आवडला नविन ड्रेस.
मग एकेक जण यायला सुरुवात झाली. काकु, आत्या, ताई बरेच जण आले. मी बघत होतो सगळे जण आईला छोटे छोटे गोल आकाराचे काहीतरी देत होते , आई पण त्यांना देत होती आणि म्हणत होते, "तिळगुळ घ्या, गोड बोला." पण मला नाही दीले कोणी :(
थोड्या वेळाने ही सगळी गँग अचानक माझ्याकडे वळली. एका खोक्यात काहीतरी पांढरे पांढरे दोर्‍याला बांधलेले होते. ते माझ्या हातांना, पायांना बांधले, गळ्यात पण घातले. आईने तर माझ्या डोक्यावर पण काहीतरी बांधले. आजी म्हणाली,'आर्यन किती छान दीसतोय हलव्याचे दागिने घालुन.' तेव्हा मला कळले हेच ते हलव्याचे दागिने. माझे खुप फोटो काढले सगळ्यांनी.


 मग मला आत्याच्या मांडीत बसवुन सगळे जण वाटीतुन चुरमुरे, चॉकलेट्स, बोरे, छोटे छोटे गोल (जे मगाशी सगळे एकमेकांना देत होते ते) माझ्या अंगावर ओतत होते. शेजारची मुलं आणि माझे ताई, दादा पटापट माझ्या अंगावर आजु बाजुला पडलेली चॉकलेट्स, बोरे उचलत होते. मग मी पण पकडत होतो पण माझ्या हातात फक्त चुरमुरेच आले. मला खुप मज्जा आली खाउमध्ये खेळायला. बघा तुम्हीच,आज मला सगळ्यांनी काय काय आणले होते नविन अंगे, खेळणी, खाउ बरेच प्रकार. सगळ्यांना खाउ खाताना पाहून मला पण भुक लागली. आईला कसे कळले काय माहित ती दुदुची बाटली घेउन आलीच तेव्हढ्यात. मला दुदु पिताना कधि झोप लागली तेच कळले नाही.

गुरुवार, जानेवारी २८, २०१०

खाबुनंदन

हे माझे आणखी एक नाव आहे.

"खाबूनंदन" खाण्याची अत्यंत आवड असलेला. मी आजीला, आईला बरेचदा लोकांना सांगताना ऐकले आहे कि मी फारसा रडत नाही.पण मला भुक लागली असेल आणि पटकन 'दुदु', 'पेज', 'भरडी', 'सेरेलॅक', 'नाचणी सत्त्व', 'फळांचे ज्युस' यापैकी काही तरी दिले गेले नाही तर मात्र मी रडुन, आरडा ओरडा करुन घर डोक्यावर घेतो. त्यामुळे माझे 'हे रुप' पाहणार्‍याला वरचे आजीचे सांगणे खरे वाटत नाही :)

तसाच माझा एक नियम आहे, झोपताना मला तोंडात 'दुदुची बाटली' लागते अशी, 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

आणि मी झोपलो असलो तरी ती काढायची नाही. आपोआप गळुन पडली की मगच उचलायची. कशी ते पहा,
 

शुक्रवार, जानेवारी २२, २०१०

बाबांचे मित्र.......आईच्या मैत्रिणी...........

मी साधारण दोन अडीच महिन्यांचा असेन, बाबा मला आजीच्या इथुन आमच्या घरी घेउन आले होते weekend मध्ये खेळायला. मला मस्त मज्जा आली. संध्याकाळी बाबांचे चार पाच मित्र आले घरी, मला भेटायला.
ती भेट अशी घडली, सगळे जण माझ्या पाळणाच्या भोवती उभे राहीले, माझ्याकडे बघुन हसले वगैरे आणि बाबांना म्हणाले,'कसला चिकणा आहे रे तुझा मुलगा, एकदम घारुअण्णा'. एकही जण मला हात लावायच्या सुध्दा भानगडीत पडला नाही.
बहुधा त्यांचे सर्व लक्ष बाबांनी आणलेल्या गजाननच्या बटाटेवड्यांमध्ये आणि प्रशांतच्या गुलाबजामांमध्ये असावे. कारण काहीही असो.

आता बरोब्बर याच्या विरुद्ध काय घडले ते सांगतो, मी छान पैकी एकटा पंख्याशी खेळत होतो असा,
तेव्हढ्यात घराची बेल वाजली. आईने दार उघडले आणि मोठ मोठ्यांदा हसण्याचा, बोलण्याचा आवाज येवु लागला. पाहीले तर आईच्या "दोन" मैत्रिणी आलेल्या, मलाच भेटायला.
आल्या आल्या मला उचलुन घेउन so cute, so cute म्हणत दोन्ही गालांचे हजार हजार तरी पापे घेतले असतील. त्या गेल्यावर मला कळले, माझा एक गाल गुलाबी आणि एक मरून दिसत होता, कारण एकीनी गुलाबी lipstick लावलेली व दुसरीनी मरून.
मग आईने खास त्यांच्यासाठी बनवलेली पावभाजी आणली खायला तर डाएटच्या नावाखाली एकीने भाजीबरोबर एक पाव खल्ला आणि दुसरीने दीड पाव, तेही अगदी नको नको म्हणत. चमचम मिठाई सुद्धा दोघीत मिळून एक खाल्ली त्यांनी.
यांच्या जागी जर माझ्या बाबांचे मित्र असते ना तर आईला पण खायला उरली नसती पावभाजी.
खाणे पिणे झाल्यावर माझे फोटोसेशन सुरु झाले त्यांच्याबरोबर आणि मग मात्र माझे हाल विचारु नका, आणखी काही सांगत नाही, तुम्हीच बघा,

कसं धरलयं मला :(Uncomfortable position


आता ठेवा मला खाली pleeeeeeeeeeease

बुधवार, जानेवारी २०, २०१०

कशासाठी पासपोर्टसाठी

आज मला आईने एका नविन स्वच्छ पांढर्‍या दुपट्यावर ठेवले. एका सरळ रेषेत. माझे टोपरे पण काढुन टाकले (बरं वाटलं) आणि फोटो कढायला सुरुवात केली. भरपुर फोटो काढले तीने, वेगवेगळ्या कोनातुन. पोटभर फोटो काढुन परत टोपरे बांधुन मला पाळण्यात ठेवले. संध्याकाळी बाबांनी घरी आल्यावर आईला विचारले, आर्यनचे फोटो काढलेस का?
आईने डिजिकॅम मधले फोटो बाबांना दाखवले. एकेक फोटो पाहून बाबांना हसू आवरेनासे झाले. काही फोटोंना तर बाबांनी काय म्हटले माहित्ये, 'सोमालियातील कुपोषित बालकाचे फोटो'. हे ऐकुन आई मात्र थोडी रागावली. हे बघा ते फोटो,


दुसर्‍या दिवशी पुन्हा माझे टोपरे काढुन फोटोसेशन सुरु झाले. आज मी ठरवले होते की आईला छान पोझेस द्यायच्या, काल बाबा हसले ना माझ्या फोटोंना. अशी मस्त पोझ दिली, तरी काही आईला पसंत पडेना.


कारण बाबांनी आईला सांगितले होते, फोटोत आर्यनचे दोन्ही दोळे उघडे असायला हवेत आणि दोन्ही कान नीट दिसत असले पहीजेत. त्यामुळे दोन तिन दिवस रोज आमचा हा फोटोसेशनचा कार्यक्रम चालला होता आणि एक दिवस आईला हवा तसा फोटो मिळाला. हा बघा तो फोटो,

तशीच मजा बाबांबरोबर झाली. माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याला काहीतरी नीळं लावून तो त्या कागदावर ठेवायला जात, पण माझा अंगठा कागदावर नेइपर्यंत माझी मूठ मिटली जायची आणि माझा तळहात, बाबांची बोटं सगळं नीळं नीळं होउन जात असे. शेवटी कसातरी दोघांनी मिळून माझ्या अंगठ्याचा ठसा घेतला. हे सगळं कशासाठी चाललं होतं तर म्हणे माझ्या पासपोर्टसाठी.

मला एक प्रश्न पडलाय, कोण आहे हा पासपोर्ट आणि त्याला माझा फोटो कशाला हवा होता?

मंगळवार, जानेवारी १९, २०१०

एक महिन्याचा

आज ८ ऑक्टोबर मी आज एक महिन्याचा झालो, आजीने नक्कीच काही तरी celebration ठरवले असणार. मालिशवाल्या मावशीनी पण चांगले मळून काढले मी मोठा (एक महिन्याचा) झालोच्या नावावर. मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ झाली, ओव्याची धुरी पण घेउन झाली. मावशी मला कपडे घालत होत्या तेव्हाच आजी ताम्हनात निरांजन, सुपारी, दुर्वा, कापुस, चांदीची चमचा वाटी असे सगळे सहित्य घेवुन आली. मला कळेना आता या सगळया मिळून मला काय करणार आहेत ते!

मग आजीने मला मांडीवर घेतले, आई मला औक्षण करु लागली, आजीने आईला सांगितले, आता याच्या डोक्यावर दुर्वा ठेव (मनात म्हण) दुर्वांसारखा वंशविस्तार होउदे. मग माझ्या डोक्यावर कापुस ठेवायला सांगुन मला म्हणाली, कापसासारखा म्हातारा हो बरं का! हे होतय तेव्हढ्यात आजोबा म्हणाले, त्याला धारणावर चढवा हो! आईने माझ्या मनातला प्रश्न विचारला,' धारणा वर चढवा म्हणजे काय आणि कशासाठी?'

आजोबांनी सांगीतले, धारण म्हणजे घरातला मुख्य खांब आणि त्याच्यावर चढवायचे कारण त्याच्या सारखा उंच, मजबुत आणि घरादाराचा आधारस्तंभ होउदे हा माझा नातु.

आता मला खांबावर चढवणार आहेत हे ऐकले आणि मी झोपेचे सोंग घेतले, म्हणजे हे संकट टळेल.


पण नाहीच सगळ्यांनी मिळुन माझे पाय खांबावर चढवल्यासारखे केलेच.

माझ्या एक महिन्याच्या वाढदीवसाला केलेली खीर फक्त एक बोट माझ्या तोंडाला लावुन बाकीच्यांनी फस्त केली.

सोमवार, जानेवारी १८, २०१०

बारसं , २० सप्टेंबर २००८

आज सकाळपासुन घरात काहितरी गडबड सुरु आहे. कळत नाहीये काय ते, पण आजी म्हणत होती 'बारसं' आहे आज. तेव्हढ्यात मला झोप लागली त्यामुळे पुढचे काही कळले नाही. जाग आली तेव्हा रोजच्यापेक्षा घरात जास्त माणसं जमा झाली आहेत असे वाटले.

आई मला नविन अंगा घालत होती आणि म्हणाली, 'शनु आज तुझं बारसं आहे, तुला नविन नाव मिळणार'. अरेच्च्या! म्हणजे माझेच कहितरी आहे आज. तरीच मला नटवत आहेत. पण मला काय करायचेय नविन नाव, आईचा 'शनु', बाबांचा 'ढबुल्या', आजीचा,'राणाप्रताप' आणि आईच्या मैत्रीणींचा, 'Smallie' एव्हढी नावं असताना.

आजुबाजुला रंगीत फुगे,फुलं होती मी छान खेळत होतो पाळण्यात. मग मला आजी आणि दुसरी आजी यांनी 'गोविंद घ्या कोणि गोपाळ घ्या' म्हणत पाळण्याच्या वर खाली फिरवीले, मज्जा आली. मग आईने हळूच माझ्या कानात सांगीतले, "आर्यन"

मी मावशीच्या मांडीवर पडुन होतो, आई शेजारी बसली होती आणि बाबा फोटो काढत होते. मग एक एक काकु, मामी , सगळ्या जमलेल्यांनी मला काय काय द्यायला सुरुवात केली. प्रत्येक जण एकेक कपडा घेउन माझ्या अंगावर ठेवी, दुपटे पांघरुन दाखवी, टोपरे पण डोक्याला लावत. कंटाळा आला मला, मी आधी रडून दाखवले, शु शु पण केली नविन कपड्यांवर तरी काही नाही, थोड्या वेळ थांबत की पुन्हा आपले सुरु. शेवटी मीच झोपुन गेलो,


जाग आली तेव्हा आईच्या कुशीत होतो. घरी पण रोजचीच सगळी माणसं दिसत होती.

संपलं वाटत 'बारसं'

शुक्रवार, जानेवारी १५, २०१०

पहिला दीवस, ९ सप्टेंबर २००८आज मी एक दीवसाचा आहे. एका दीवसात किती लोक येवुन बघुन गेले, बापरे! पण मला फक्त आईलाच ओळखता येते झोपेत असलो तरी.

स्वागत

सुस्वागतम!

माझ्या विश्वात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत! स्वागत! स्वागत!
तुम्हाला मी माझ्या जगात घेउन जाणार आहे, चला तर मग या आगळ्या वेगळ्या दुनियेच्या सफरीला.