समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

समारंभ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समारंभ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, मार्च ०५, २०१०

पहिली मम्मम्



आज आई सकाळपासून एव्हढी साफसफाई का बरं करत्ये? आजी पण सकाळीच आली, येताना भरपुर डबे आणि काय काय खाऊ घेवुन आली. आईने जयेशमामाला फोन केला आणि सांगितले, बरोब्बर दुपारी १२.३०वा. ये रे उशिर नको करु कारण तू आल्याशिवाय कार्यक्रम सुरु करता येणार नाही.

आता कळलं काहितरी कार्यक्रम आहे घरात. तरीच एव्हढी गडबड चालली आहे.

माझ्या दोन्ही मावशांचा अजुन पत्ता नव्हता आणि बाबा बाहेर गेले होते, त्यामुळे मला आईने किचनमध्येच एका दुपट्यावर ठेवले. आजुबाजुला बर्‍याच वस्तु असल्यामुळे मी लगेच उपडा वळलो, बाबांच्या भाषेत King Cobra Position मध्ये आलो. मी पाहिलं आई एका छान चकाकणार्‍या ताटात छान छान खाऊ वाढत होती. त्या ताटात तशाच चकाकणार्‍या दोन वाट्या आणि चमचा पण होता.मी हे सगळ बघत असतानाच आई म्हणाली, शनु, आज तुझी पहिली मम्मम् मोठ्या ताटात आमच्यासारखी. आजी म्हणाली, 'उष्टावण' म्हणायच त्याला. आज आजी कठीण भाषेत बोलत होती. मला खुप आनंद झाला पण मी जेवणार कसा?

तेव्हढ्यात जयेश मामा आला. त्याने मला एक कापडाचा बॉल दिला मी चावुन बघितला एकदम मऊ मऊ होता. थोड्या वेळाने रुपामावशी आणि शमुमावशी पण आल्या. बाबा आल्यावर सगळे हॉलमध्ये जमलो. माझं लक्ष माझ्या ताटाकडेच होतं.

आईने मला नेहेमीसारखं ओवाळलं मग आजीने मामाला सांगितले या सोन्याच्या अंगठीने आर्यनला खीर चाटवं. मी चाटुन पुसुन खल्ली अंगठीची खीर. छान होती.




मग बाबांनी लाडू दीला मला खायला, माझ्या तोंडात शिरलाच नाही, मी त्याला चाटुन बघितलं गोड गोड लागला मला.


आजीने पुरणपोळीचा छोटुसा घास भरवला तो मात्र मला मस्त खाता आला.


शमुमावशीने भरवलेलं श्रीखंड पण मला खूप आवडलं. आईने मला गोडाच्या शिर्‍याचा घास दीला. चमच्याने वाटीतली सगळी खीर पण भरवली. मी छोटासा वरणभात पण खल्ला. माझं पोट खूप भरलं. माझ्या ताटात कितीतरी पदार्थ होते श्रीखंड, पुरी, खीर, लाडू, शिरा, पुरणपोळी, वरणभात, लिंबू, दही, लोणचं, चटणी, कोशिंबीर, पापड, फेणी, पुलाव बापरे!


आता कळलं ही मोठी माणसं भरडी का खात नाहीत!

शुक्रवार, फेब्रुवारी १९, २०१०

शितळ शिमगा (रंगपंचमी)

काल मी बाबांच्या आत्याकडे गेलो होतो म्हणजे माझी आत्याआजी. जाताना तिने मला १००रु. दीले आणि म्हणाली, शितळ शिमगा आहे ना, पांढरा कपडा घे हो त्याला. माझं काय बाजारात जाण होत नाही. आई आजीला हो म्हणाली. १५ तारखेला आर्यनचा शितळ शिमगा करायचा ठरवलं आहे. नक्की या तेव्हा. असे आमंत्रण पण दीले आईने तिला. तेवढे मी बरोबर ऐकले.

तिथुन आम्ही बाहेर पडलो शॉपिंगला. मला दोन सुती अंगे घेतले, मग खुप सार्‍या छोट्या छोट्या खायच्या रंगाच्या दब्या घेतल्या आईने. गुलाबी, हिरवा, पिवळा, केशरी. येताना कानेटकरांकडे पुरणपोळीची ऑर्डर पण दिली.
पण मला काही केल्या कळतं नव्हत शितळ शिमगा हे काय आहे. रात्री आई मला सांगत होती, शनु, हा तुझा पहीला उन्हाळा मग तुला त्याची ओळख करुन द्यायला आपण परवा शितळ शिमगा करायचा आहे. एवढेच सांगितले, म्हणजे काय करायचे आहे ते काही बोलली नाही.

आज १५ मार्च २००९. मला खुप उत्सुकता आहे शितळ शिमगा बघायची.
आइने चार बाउल घेतले त्यात त्या परवा घेतलेल्या रंगाच्या डब्यांमधले खाऊचे रंग टाकले आणि पाणी घालुन मस्त केशरी, हिरवे, गुलाबी, पिवळे पाणी तयार केले. मधे शेवंती, मधुमालतीची फुलं ठेवली. आत्याने गंमत आणली होती बत्ताशांचा हार आणि द्राक्षांची माळ.



















मला आत्तुच्या मांडीत बसवले आणि गळ्यात द्राक्षांची आणि बत्ताशांची माळ घातली. आजीने ओवाळले आणि मग एकेकांनी फुलांनी माझ्यावर ते मगाचचे रंगच उडवायला सुरुवात केली. कोणी अंग्याला रंग लावला, कोणी गालाला, तर कोणी हाताला. मज्जा येत होती, गार गार वाटत होतं मला.


















मी तर हळुच माळेतलं एक द्राक्ष पण खाल्लं होतं मग आईने तोंडात बोट घालुन काढलं आणि छोटे छोटे कण करुन भरवलं :)














तर असा होता माझा शितळ शिमगा म्हणजेच रंगपंचमी. आई पण ना! सोप्पी गोष्ट कठीण करुन सांगते. आधीच सांगायचं ना रंगपंचमी करायच्ये म्हणुन. शितळ शिमगा काय प्रकार आहे याचा विचार करण्यात किती वेळ गेला माझा दोन दीवस!