समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

सण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, फेब्रुवारी १९, २०१०

शितळ शिमगा (रंगपंचमी)

काल मी बाबांच्या आत्याकडे गेलो होतो म्हणजे माझी आत्याआजी. जाताना तिने मला १००रु. दीले आणि म्हणाली, शितळ शिमगा आहे ना, पांढरा कपडा घे हो त्याला. माझं काय बाजारात जाण होत नाही. आई आजीला हो म्हणाली. १५ तारखेला आर्यनचा शितळ शिमगा करायचा ठरवलं आहे. नक्की या तेव्हा. असे आमंत्रण पण दीले आईने तिला. तेवढे मी बरोबर ऐकले.

तिथुन आम्ही बाहेर पडलो शॉपिंगला. मला दोन सुती अंगे घेतले, मग खुप सार्‍या छोट्या छोट्या खायच्या रंगाच्या दब्या घेतल्या आईने. गुलाबी, हिरवा, पिवळा, केशरी. येताना कानेटकरांकडे पुरणपोळीची ऑर्डर पण दिली.
पण मला काही केल्या कळतं नव्हत शितळ शिमगा हे काय आहे. रात्री आई मला सांगत होती, शनु, हा तुझा पहीला उन्हाळा मग तुला त्याची ओळख करुन द्यायला आपण परवा शितळ शिमगा करायचा आहे. एवढेच सांगितले, म्हणजे काय करायचे आहे ते काही बोलली नाही.

आज १५ मार्च २००९. मला खुप उत्सुकता आहे शितळ शिमगा बघायची.
आइने चार बाउल घेतले त्यात त्या परवा घेतलेल्या रंगाच्या डब्यांमधले खाऊचे रंग टाकले आणि पाणी घालुन मस्त केशरी, हिरवे, गुलाबी, पिवळे पाणी तयार केले. मधे शेवंती, मधुमालतीची फुलं ठेवली. आत्याने गंमत आणली होती बत्ताशांचा हार आणि द्राक्षांची माळ.



















मला आत्तुच्या मांडीत बसवले आणि गळ्यात द्राक्षांची आणि बत्ताशांची माळ घातली. आजीने ओवाळले आणि मग एकेकांनी फुलांनी माझ्यावर ते मगाचचे रंगच उडवायला सुरुवात केली. कोणी अंग्याला रंग लावला, कोणी गालाला, तर कोणी हाताला. मज्जा येत होती, गार गार वाटत होतं मला.


















मी तर हळुच माळेतलं एक द्राक्ष पण खाल्लं होतं मग आईने तोंडात बोट घालुन काढलं आणि छोटे छोटे कण करुन भरवलं :)














तर असा होता माझा शितळ शिमगा म्हणजेच रंगपंचमी. आई पण ना! सोप्पी गोष्ट कठीण करुन सांगते. आधीच सांगायचं ना रंगपंचमी करायच्ये म्हणुन. शितळ शिमगा काय प्रकार आहे याचा विचार करण्यात किती वेळ गेला माझा दोन दीवस!

शुक्रवार, जानेवारी २९, २०१०

बोरनहाण

आई फोनवर काकुला सांगत होती, 'उद्या या हं आर्यनचे बोरनहाण आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या, मग आर्यनला हलव्याचे दागिने घालु आणि सुरु करु.'
संध्याकाळी या, आर्यनला हलव्याचे दागिने घालु वगैरे ऐकले आणि वाटलं परत बारसं आहे वाटतं माझं. असा विचार करत असतानाच झोप लागली.
दुसरा दीवस सुरु झाला, घरात गडबड सुरु होतीच, खाद्यपदार्थांचे छान छान वास येत होते. मला आई बाबांनी छान काळा ड्रेस आणला होता, त्याच्यावर आईस क्रीम चे चित्र होते, चांदण्या होत्या. मला आवडला नविन ड्रेस.
मग एकेक जण यायला सुरुवात झाली. काकु, आत्या, ताई बरेच जण आले. मी बघत होतो सगळे जण आईला छोटे छोटे गोल आकाराचे काहीतरी देत होते , आई पण त्यांना देत होती आणि म्हणत होते, "तिळगुळ घ्या, गोड बोला." पण मला नाही दीले कोणी :(
थोड्या वेळाने ही सगळी गँग अचानक माझ्याकडे वळली. एका खोक्यात काहीतरी पांढरे पांढरे दोर्‍याला बांधलेले होते. ते माझ्या हातांना, पायांना बांधले, गळ्यात पण घातले. आईने तर माझ्या डोक्यावर पण काहीतरी बांधले. आजी म्हणाली,'आर्यन किती छान दीसतोय हलव्याचे दागिने घालुन.' तेव्हा मला कळले हेच ते हलव्याचे दागिने. माझे खुप फोटो काढले सगळ्यांनी.


















 मग मला आत्याच्या मांडीत बसवुन सगळे जण वाटीतुन चुरमुरे, चॉकलेट्स, बोरे, छोटे छोटे गोल (जे मगाशी सगळे एकमेकांना देत होते ते) माझ्या अंगावर ओतत होते. शेजारची मुलं आणि माझे ताई, दादा पटापट माझ्या अंगावर आजु बाजुला पडलेली चॉकलेट्स, बोरे उचलत होते. मग मी पण पकडत होतो पण माझ्या हातात फक्त चुरमुरेच आले. मला खुप मज्जा आली खाउमध्ये खेळायला. बघा तुम्हीच,



















आज मला सगळ्यांनी काय काय आणले होते नविन अंगे, खेळणी, खाउ बरेच प्रकार. सगळ्यांना खाउ खाताना पाहून मला पण भुक लागली. आईला कसे कळले काय माहित ती दुदुची बाटली घेउन आलीच तेव्हढ्यात. मला दुदु पिताना कधि झोप लागली तेच कळले नाही.