दुसर्या दिवशीच मला कळलं, या दोघी माझ्यावरच काहितरी प्रयोग करणार आहेत. त्यांच एकमत होत नव्हत, काय बर करुया ह्याला? कृष्ण करुया, रामदास स्वामी, की दुसरं काहितरी. ता म्हणाली कृष्ण करुया, आईला ते फारसं पटलं नाही कारण मी टोपरं, टोपी, फुलांचा, पुठ्ठ्याचा मुकुट यापैकी काहीही २ सेकंद सुद्धा डोक्यावर टिकुन देत नाही. बिना मोरपिसाच्या कृष्णाची आईला कल्पना करवेना. तसेच हातातली बासरी कंटाळा आला तर मी मधेच कुठेही फेकून देण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. त्यामुळे मला कृष्ण बनवण्याची कल्पना कॅन्सल झाली. आता याला काय बनवावा बरे, असा विचार सुरु झाला.
तेव्हढ्यात मला नविन आणलेल्या धोतीची आईला आठवण झाली. एकदम खुश हॊऊन ती म्हणाली आपण आर्यनला ’भटजी’ करुया. धोतर आहे, एक जानवं घालुया की झाले ’केळकर गुरुजी’ तयार. ठरलं.
बाबांनी या कल्पनेला एकदम तुच्छ ठरवले, पण आईने त्याकडे लक्ष दिले नाही.
मग माझी आजीकडे रोज पाच - दहा मिनीटे प्रॅक्टीस सुरू झाली. धोतर नेसायचे आणि हॉलमध्ये फिरायचे. मजा यायची मला. मी चांगला चालत असे धोतर नेसून. शनू, चाल असे म्हटले की एकदम स्पीडमध्ये चालायला सुरुवात, थांब म्हटले की मी आहे तिथे थांबत असे.
कधिकधि दमून मी असा बसून राही मग मला छान खाऊ दिला जायचा.
मी मधेच भाषण देण्याच्या पावित्र्यात उभा राहून मूक संवाद पण म्हणून दाखवीत असे आणि सगळे टाळ्या पण वाजवायचे.
बाबांना पण प्रॅक्टीसच्या गमती सांगून आईने फोटो दाखवले. फोटो बघून बाबा म्हणाले वा! आर्यन पॉश भटजी आहे, एकदम बॉडीफिट टि-शर्ट वगैरे घातलाय.
आईने सांगितले, मला मिळालेल्या बक्षिसाचे आई, ता आणि मी आईसक्रीम खाणार.
बाबा म्हणाले, नाही! ते पैसे त्याच्या बॅक अकाउंट मधे जमा केले जातील.
आई - त्याच्यावर आम्ही मेहेनत घेत आहोत तेव्हा बक्षिसाचे काय करायचे ते आम्ही ठरवणार.
बाबा - मी आर्यनचा फायनान्स मॅनेजर आहे तेव्हा मी ठरवणार त्याच्या बक्षिसाचे काय करायचे ते.
अशाप्रकारे मला न मिळालेल्या बक्षिसावरून आईबाबांचे भांडण पण झाले.
त्यानंतर मधेच कहानीमे एकदम ट्विस्ट आला. कारण आजीने एक फतवा काढला, एवढा लहान माझा नातू त्याला काही स्पर्धेत भाग घ्यायला नकोय. अशाप्रकारे माझी प्रॅक्टीस पण बंद झाली. बरं झालं नाहितरी त्या धोतरात मला अडकल्यासारखच व्हायचं.
ता ला मात्र प्रचंड वाईट वाटलं. कारण तिने सोसायटीमधे सगळ्यांना सांगून टाकलं होतं, आमचा आर्यन पण भाग घेणार आहे, वगैरे वगैरे. त्यामुळे मी स्पर्धेत भाग घेणं हा तिच्या प्रेस्टीजचा प्रश्न झाला होता.
शेवटी तो दिवस आला. सगळी मुलं काय काय बनली होती कोणी कृष्ण, कोणी विठोबा, कोणी बटाटा, कोणी परी, कोणी न्युज पेपर, कोनी नवरी, कोणी नेता. मी कोणीच नाही बनणार म्हणून ता खूप दु:खी झाली होती. प्रेक्षकांत बसलेले असतानाच ती आईला म्हणाली चला ना आपण आर्यनला भटजी करूया. बहुतेक आईला पण वाटल, आपल्या मुलाने स्टेजवर बागडावं.
ता ने धावत जाउन माझे वेषभूषेचे सामान आणले. पाच मिनिटात मला धोतर नेसवण्यात आलं आणि जानवं गळ्यात घालून मी आईबरोबर स्टेजवर कधि पोचलो ते मला कळलं सुद्धा नाही.
माझा स्टेज पफॉरमन्स पहायचाय, हा बघा,



