समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

मंगळवार, सप्टेंबर ०७, २०१०

८ सप्टेंबर, मागच्या वर्षीचा

मला अचानक ८ सप्टेंबरची का आठवण झाली?
पटकन उत्तर हवं असेल तर फोटो पहा आणि सावकाश कळलं तरी चालणार असेल तर पोस्टच वाचा.
तर मागच्या ८ सप्टेंबरची सुरुवात अशी झाली. आंघोळ झाल्यावर आजीने आणलेला नविन ड्रेस घातला मग आईच्या मांडीवर बसलो. आजीने मला औक्षण केले, माझ लक्ष मात्र खाली ठेवलेल्या ढोकळा आणि जिलबीकडे होतं :)

छान छान खाऊ खावुन दुपारी मस्त झोपलो. झोपुन उठल्यावर बघतो तर काय अजुन एक नविन ड्रेस. मावशीने मला जीन्सची पॅंट आणली होती. माझी पहिली जीन्स. मग मी जीन्स पॅंट आणि टी शर्ट घालुन तयार झालो.


मला कळेचना की आमची सगळी गॅंग नक्की कुठे चालली आहे. एका ठिकाणी सगळे गाडीतुन उतरलो. आमच्या बरोबर भरपुर सामान होते. मोठ्या पिशव्या, बॉक्स, इ. तिथे आत गेल्यावर बघतो तर काय मस्त सजावट केलेली, फुगे लावलेले, आणि गंम्मत म्हणजे भिंतीवर सगळीकडे माझेच फोटो लावले होते.
हळु हळु एक एक दादा, काका, मावशी, माझे मित्र मैत्रिणी सगळे जमले तिथे. प्रत्येक जण यायचा मला शेकहॅंड करायचा आणि काहीतरी रंगीबेरंगी बॉक्स माझ्या हातात द्यायचे. मग आई किंवा मावशी माझ्या हातातुन काढून घ्यायचे, मी जोरात ओरडायचो, मला हवा असायचा तो बॉक्स माझ्या हातात.
तिथे भरपुर जणं जमल्यावर मला बाबांनी उचलुन घेतले. आई, बाबा आणि मी स्टेजवर गेलो. तिथे दोन दोन केक होते. सगळ्यांनी एका सुरात गाणे म्हटले, 'HAPPY BIRTHDAY TO YOU, AARYAN'
आई बाबांनी माझा हात धरुन केक कापला. कुणी मला भरवला तर कुणी मला असा रंगवला.





माझ्या मित्र मैत्रिणी आणि ताई दादांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या.

मग छोट्या मानसीताईने जादूचे प्रयोग करुन दाखवले.

ते बघता बघता मला आणि माझ्या मित्राला झोपच आली. बरं झालं आईने माझं अंथरुण पांघरूण आणलं होतं बरोबर. मित्राला पण अचानक झोप आल्यामुळे एकाच अंथरूणावर कसे बसे झोपलो आम्ही दोघं. आई म्हणाली, पुढच्या वेळी लक्षात ठेवायला हवं, वाढदिवसासाठी बोलवलेल्या गेस्टसाठी पण अंथरुण पांघरूण आणायला हवं.

मला जेव्हा जाग आली तेव्हा मी काय पाहीलं माहीत्ये? आई बाबा मस्तपैकी श्रीखंड पुरी, कॉर्न टिक्की, छोले, पनीर मसाला, पुलाव, केक असे छान छान खाऊ खात होते. मी उठलो आणि डायरेक्ट आईच्या पुढ्यातच जावून बसलो. माय फेव्हरेट श्रीखंड पुरी खायला.

असा हा मागच्या वर्षीचा ८ सप्टेंबर उद्या परत येणार आहे.