आज मला आईने एका नविन स्वच्छ पांढर्या दुपट्यावर ठेवले. एका सरळ रेषेत. माझे टोपरे पण काढुन टाकले (बरं वाटलं) आणि फोटो कढायला सुरुवात केली. भरपुर फोटो काढले तीने, वेगवेगळ्या कोनातुन. पोटभर फोटो काढुन परत टोपरे बांधुन मला पाळण्यात ठेवले. संध्याकाळी बाबांनी घरी आल्यावर आईला विचारले, आर्यनचे फोटो काढलेस का?
आईने डिजिकॅम मधले फोटो बाबांना दाखवले. एकेक फोटो पाहून बाबांना हसू आवरेनासे झाले. काही फोटोंना तर बाबांनी काय म्हटले माहित्ये, 'सोमालियातील कुपोषित बालकाचे फोटो'. हे ऐकुन आई मात्र थोडी रागावली. हे बघा ते फोटो,
दुसर्या दिवशी पुन्हा माझे टोपरे काढुन फोटोसेशन सुरु झाले. आज मी ठरवले होते की आईला छान पोझेस द्यायच्या, काल बाबा हसले ना माझ्या फोटोंना. अशी मस्त पोझ दिली, तरी काही आईला पसंत पडेना.
कारण बाबांनी आईला सांगितले होते, फोटोत आर्यनचे दोन्ही दोळे उघडे असायला हवेत आणि दोन्ही कान नीट दिसत असले पहीजेत. त्यामुळे दोन तिन दिवस रोज आमचा हा फोटोसेशनचा कार्यक्रम चालला होता आणि एक दिवस आईला हवा तसा फोटो मिळाला. हा बघा तो फोटो,
तशीच मजा बाबांबरोबर झाली. माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याला काहीतरी नीळं लावून तो त्या कागदावर ठेवायला जात, पण माझा अंगठा कागदावर नेइपर्यंत माझी मूठ मिटली जायची आणि माझा तळहात, बाबांची बोटं सगळं नीळं नीळं होउन जात असे. शेवटी कसातरी दोघांनी मिळून माझ्या अंगठ्याचा ठसा घेतला. हे सगळं कशासाठी चाललं होतं तर म्हणे माझ्या पासपोर्टसाठी.
मला एक प्रश्न पडलाय, कोण आहे हा पासपोर्ट आणि त्याला माझा फोटो कशाला हवा होता?