समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

मंगळवार, जून ०८, २०१०

न लटकता लोकलने

बाबा चारचारदा आईला सांगत होते नीट ने त्याला, पूर्ण थांबल्याशिवाय चढु नको, जास्त सामान नेवू नको, वगैरे वगैरे.या बोलण्यावरून मला एव्हढे कळले की आई आणि मी दोघेच कुठेतरी जात आहोत. चार वाजता रविनाताई, आई आणि मी आवरून तयार झालो. रिक्षेत बसल्यावर आईच्या बोलण्यातुन मला कळले की आम्ही डोंबिवलीला चाललो आहोत, लोकल ट्रेनने. मला किती आनंद झाला म्हणून सांगू!

का म्हणजे?

माझ्या आईने एक ठराव पास केला होता, मी एक वर्षाचा होईपर्यंत मला लोकलने कुठेही न्यायचे नाही. माझी आई काय ठरवेल सांगता येणार नाही. त्यामुळे मी आमची गाडी, रिक्षा, बस, घोडागाडी, विमान हे सगळ बघितलं होत पण लोकल काही पाहिली नव्हती.


आईला बरेचदा बाबांना सांगताना मी ऐकले होते की मी लोकलमधे हे कानातले घेतले, हा छोटा आरसा घेतला, आज कोणीतरी माझ्या पायावर पाय दिला, आज लोकलमधे असं झालं आणि आज लोकलमधे तसं झालं. त्यामुळे ही लोकल कोण आहे आणि ती एकटी हे सगळं कस करू शकते हे पहायची मला खूप उत्सुकता होती.


आम्ही एकदाचे स्टेशनवर पोचलो. कुपन्स पंच केली आणि प्लॅटफॉर्मवर जावून उभे राहिलो. मी सगळीकडे पहात होतो, नुसती माणसच माणसं होती सगळीकडे. आईने मला उचलुन घेतले होते. मधेच एक खूप मोठा आवाज आला, मी घाबरून आईला घट्ट धरून ठेवले. आमच्या पलिकडल्या प्लॅटफॉर्मवर एक गाडी थांबली ती एव्हढी लांब होती की तीची सुरुवात कुठुन झाल्ये आणि संपल्ये कुठे तेच दिसत नव्हते. मग आम्ही आधिपासूनच उभ्या असलेल्या एका तसल्याच लांब गाडीत जावुन बसलो. तेव्हा आई म्हणाली, शनु, या गाडीला लोकल ट्रेन म्हणतात. आता कळलं, लोकल एव्हढ्या सगळ्या गोष्टी एकटी कशी करते.


आम्ही बसलो ती लोकल एकदम रीकामी होती. मस्त खिडकीजवळच्या सीटवर बसलो होतो. बर्‍याच वेळानंतर आमची लोकल सुरू झाली. त्या लोकलमध्ये छोटी छोटी दुकानच होती. बागड्या, कानातले, पिनांचे दुकान. टिकल्यांचे दुकान. मग एक आजीबाई चिकू घेवुन आली टोपलीभर.


लोकल सुरू झाल्यावर छान वारा आला आणि आमची लोकल एकदम धाडधाड जात होती, मला जाम मज्जा वाटत होती. आजूबाजूच्या सगळ्या जणी माझ्याकडे बघून उगीचच हसत होत्या. गाडी मधे मधे थांबायची मग गाडीतल्या काही बायका खाली उतरायच्या काही गाडीत चढायच्या. मला एक प्रश्न पडला, की ड्रायव्हरला कसं बरोब्बर कळायचं की या सगळ्यांना कुठे उतरायचे आहे?


तसेच गाडीतली दुकानं पण सारखी बदलत होती, रुमालांचे दुकान पण होते तिथे. मग एक खाऊचे दुकान आले पॉपकॉर्न, वेफर्स, लिमलेटच्या गोळ्या, आवळासुपारी, जीरा गोळी, चॉकलेट्स, वगैरे. आईने श्रीखंडाच्या गोळ्या घेतल्या. मी कडकड चावून दोन-तिन गोळ्या खावून टाकल्या एकदम. मला आणखी खाऊ हवा होता पण आईने घेतला नाही.


आणखी एक स्टेशन गेले आणि खिडकीतल्या वार्‍याने मला मुळी झोपच यायला लागली. तसाच आईच्या मांडीत झोपुन गेलो. त्यामुळे मला डोंबिवली कधि आलं, रिक्षेत कधि बसलो आणि आत्याच्या घरी कधि पोचलो तेच कळलं नाही.

आई उगाच कंटाळते लोकलने जायला, मला तर लोकल ट्रेन खूप खूप आवडली, मज्जा येते लोकलमध्ये.