समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

रविवार, मार्च २८, २०१०

आम्ही चालवू हा पुढे (खादाडीचा) वारसाSSSSSS

'खादाडी राज्याच्या राजा’ आणि ’अष्टप्रधान मंडळा’ तुमच्यासाठी खुष खबर बरं का! तुमच्या राज्याचा वारसदार तयार झालाय इकडे :)

आईबरोबर सगळे खादाडीचे ब्लॉग वाचताना एक गोष्ट जाणवली सगळे जण खाऊच्या पदार्थांचे फोटो टाकतात, कृति कशी करायची ते सांगतात, कुठल्या हॉटेलात मिळेल ते पण सांगतात. पण खायचा कसा ते सांगत नाहीत की फोटोत दाखवत पण नाहीत. म्हणून आज मी ते काम करणार आहे.


हा फोटो पहा, मी माझा आवडता ’टोमॅटो सॉस’ खात आहे. मला सॉस एव्हढा आवडतो की प्लेटमधे ’टोमॅटो सॉस’ सोडून दुसरा कोणताच पदार्थ नाहीये. तसेच बरोबर अख्खी सॉसची बाटली ठेवली आहे. म्हणजेच आवडत्या पदार्थाचा मनमुराद आस्वाद घ्यावा. खाताना तो पदार्थ आपल्या बोटांना, तळहाताला, ओठांच्या बाजुला, स्वत:च्या कपड्यांना, फरशीला, आजुबाजुच्या वस्तूंना, माणसांना लागला तरी हरकत नाही. घरातली माणसं स्वत:सकट सगळ्यांना स्वच्छ करतात.

कोणताही पदार्थ वाया घालवू नका. आई म्हणते, शनू, फरशीवर पडलेली वस्तू तोंडात घालू नको. धुळ आणि किटाणू लागतात त्याला, आजारी पडायला होतं. मी ते मानत नाही, तोंडातून पडलेली बडीशेपची गोळीसुद्धा मी परत चिमटीने उचलून तोंडात भरतो. कारण मी ती गोळी जर टाकून दिली तर मुंगी ती गोळी खाते. जर खाली पडलेली गोळी खाऊन मुंगीला काही आजार होत नाही तर मला कसा होईल? पण अजुन बोलता येत नसल्याने मी हे आईला विचारू शकत नाही.


मला डीशमधे खायला दिलेले चुरमुरे तर मी मुद्दामुन खाली ओततो. मग पंख्याच्या वार्‍याने ते सगळ्या घरभर उडतात, त्यांना शोधून शोधून पकडून खाताना खूप मज्जा येते आणि वेळ पण चांगला जातो.

मी सगळे खाऊ डाव्या व उजव्या दोन्ही हातांच्या बोटांनी खातो, असे केल्याने कमी वेळात जास्त खाऊ खायला मिळतो. चमचा मी फक्त पोट भरले असेल आणि खायचा कंटाळा आला असेल तर ताटलीतल्या खाऊत खेळायला वापरतो. कारण ताटलीतला पदार्थ चमच्यात उचलून तोंडापर्यंत नेइस्तोवर अर्ध्या रस्त्यात कुठेतरी पडून जातो आणि आई समोर असेल तर तो पडलेला खाऊ ताटलीत परत पण येत नाही. मुंग्यांना खायला मिळतो उगाचच.

आई जेव्हा खाऊ डीशमधे काढून देत असते तेव्हा त्या खाऊची जागा नीट बघून ठेवायची म्हणजे स्वत:ला जेव्हा हवा असेल तेव्हा त्या जागेकडे, डब्याकडे बोट दाखवून, मान हलवून हलवून तो खाऊ मिळवता येतो.

हॉटेलमध्ये गेल्यावर नेहेमी सगळ्या खाऊंची चव बघायची, कारण आई बाबा मागवतात ते सगळे खाऊ खूप छान असतात. मला तिखट लागेल म्हणून माझ्यासाठी नेहेमी साधा डोसा मागवला जातो पण मी थोडासा डोसा खाऊन, आई बाबांच्यातले पण खातो. त्यांनी दिले नाही तर जोरात रडतो. मग आपोआप मला पाहिजे ते मिळते. पण चुकुन शेजवान न्युडल्स असतिल तर मात्र जाम वाट लागते. खोकला लागतो, नाक डोळे लाल लाल होतात, नाकातुन पाणी येते. पण एक बरं, आईच्या पर्समधे नेहेमी एक साखरपाण्याची बाटली असते माझ्यासाठी.

रात्री जेवण झाल्यावर लगेच झोपायचे नाही. नाहीतर रव्याचा लाडू, नारळाची वडी, आंब्याचे साठ, चॉकोलेट केकची पेस्ट्री, आईसक्रीम अगदी काही नाही तरी सफरचंद, केळं ही फळे यांसारखे उत्तमोत्तम पदार्थ खायचे राहून जातात. हा परवाचा माझा फोटो पहा, चॉकोलेट लाव्हा खातानाचा,

तुम्हा सगळ्यांना पण असाच छान छान खाऊ खायला मिळो!सोमवार, मार्च २२, २०१०

New look


देवाने मला जन्मतःच असा हेअर कट देवून पाठवले असल्याने मी एक वर्षाचा होउन गेलो तरी माझ्या केसांना कोणी कात्री लावली नव्हती. पण आता मी सव्वा वर्षाचा झालो आणि आता माझ्या केसांची थोडी थोडी वाढ होउन चांगली जुल्फ दिसायला लागली.
आजीचे म्हणणे आता उन्हाळा सुरु होणार असल्याने माझे हे वाढलेले केस कापून बारीक करावे. माझे बाबा आणि आजोबा दोघेही सौंदर्याचे उपासक. त्यांचे म्हणणे, छे! कुठे वाढलेत केस. किती छान कुरळे कुरळे आणि तलम केस आहेत. काय सुंदर दिसतात. दोघांचाही केस कापण्याला तीव्र विरोध.आजीचे म्हणणे, सौंदर्य महत्त्वाचे नाहीये. त्याला किती बरे वाटेल, हलकं होईल डोकं, गरमा कमी होईल, शांत झोप लागेल. मला सांभाळणार्‍या रविनाताई चे पण हेच मत होते.


आईचे मात्र तळ्यात मळ्यात चालले होते, ती कधि आजीच्या ग्रुप मध्ये असायची तर कधि बाबा आणि आबांच्या.

दोन शनिवार, रविवार गेले तरी माझे केस आपले आहेत तसेच. आई बाबांनी काहीच action घेतली नाही. त्यामुळे आता आजीने सूत्र आपल्या हातात घेतली. एका सकाळी ती स्वतः सलूनमध्ये जावून सांगून आली, आमच्या घरी माझ्या नातवाचे केस कापायला या, पहिल्यांदाच कापायचे आहेत म्हणून घरी बोलवत्ये. त्यादिवशी त्या न्हाव्याची वाट बघण्यात माझी आंघोळ संध्याकाळी चार वाजता झाली. पण तो काही आला नाही. दुसर्‍या ग्रुपमधली मंडळी जाम खुश झाली.

आता आजीने दुसरे शस्त्र बाहेर काढले, शुक्रवारी संध्याकाळी तिने जाहीर केले की, या शनिवार, रविवारी जर तुम्ही याचे केस कापले नाहीत तर मी स्वतः तो झोपल्यावर त्याचे वाढलेले केस कापीन. ही मात्रा बरोबर लागू पडली.
दुसर्‍या दिवशी सकाळीच बाबा मला सलून मध्ये घेवून निघाले. जायच्या आधि आईने माझ्या वाढलेल्या केसांचे, डोक्याचे खूप फोटो काढले. तिला वाटत होते न जाणो केस कापल्यावर मी कसा दिसेन. जाताना बाबा सांगून गेले, जर याने खूप आरडाओरडा, रडारड केली तर मी तसाच परत आणीन.
सलूनमधे मोठे मोठे आरसे, AC चा गार वारा, गाणी हे सगळ बघून मला जाम मजा वाटली. माझे पटकन केस कापून झाले. मी अजिबात रडलो नाही. फक्त ते मानेभोवती कापड गुंडाळून दिले नाही मी त्या माणसाला. केस कापून झाल्यावर बाबांना खूप आवडला माझा हेअरकट. सेम त्यांच्यासरखाच होता माझा कट. आई तर जाम खुश झाली आणि म्हणाली, अरे शनु तर अजुनच छान दिसायला लागला, एकदम गुंडु. फोटो काढायला विसरली नाही.


बुधवार, मार्च १७, २०१०

Happy Birthday To You!

सकाळी उठल्या उठल्या मी तिला एक गोड गोड पा दिला 'गिफ्ट' म्हणून, आता दिवसभर एकच गाणं गाणार आहे,
Happy Birthday To You, Happy Birthday To You,Happy Birthday To Dear Mom, Happy Birthday To You.

सोमवार, मार्च १५, २०१०

शुभेच्छा!

उद्या गुढी पाडवा आहे. मी आज रात्री तलावपाळीवर आतषबाजी बघायला जाणार. उद्या सकाळी स्वागतयात्रेला जाणार आणि दुपारी श्रीखंड पुरी खाउन मस्त झोपणार. म्हणून कदाचित मला वेळ होणार नाही तर मी आजच तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.
" हे नविन वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुखा समाधानाचे, आरोग्यदायी आणि आनंदाचे जावो."
तुम्हाला पण स्वागतयात्रा बघायची आहे, या माझ्यामागून,शनिवार, मार्च १३, २०१०

हापूस आंब्याची गोष्ट सांगू?

सकाळी सकाळी मला आमच्या घरात एक नविन वस्तू दिसली. चौकोनी आकाराची, लाकडाच्या पट्ट्या असलेली आणि पिवळे गवत भरलेली एक पेटी हॉलमध्ये ठेवलेली हॊती. चिपळूणचे आबा पण आले हॊते. बहुतेक त्यांनीच आणली होती ती पेटी. आबांच्या पिशवीत आणखीन काय काय खाऊ हॊता ऒले काजू, फणसाचे गरे, करवंद. आबांनीच दाखवले सगळे.

आबा गेल्यावर मी त्या पेटीला धरून उभा राहीलॊ पण मला आतलं काहीच दिसत नव्हतं. बाबांनी कधितरी ती पेटी स्वयंपाकघरात नेवून ठेवली. थोड्या वेळाने आईने ढकलत ढकलत ती ज़ोपायच्या खॊलीत नेली. मला कळत नव्हत हे काय चाललयं? मी वाट बघत हॊतॊ कधि एकदा ती पेटी उघडते.
संध्याकाळी बाबांनी त्यांच्या टूल कीटमधल्या पकडीने त्या पेटीच्या वरच्या लाकडी पट्ट्या काढल्या आणि गवत पण बाजूला केले. मी बघितले त्या पेटीत हिरव्या पिवळ्या रंगाचे काहीतरी हॊते. आईने त्यांना बाहेर काढले तेव्हा मला ती मोसंबीची फळ वाटली. पण मॊसंबी तर गॊल असते या फळांचा आकार थॊडा वेगळा होता. नकीच छॊटे छॊटे पपई असणार. तेवढ्यात आईने ती फळ परत आत ठेवून दिली आणि वर गवत लावून ठेवलं.

रोज रात्री आई त्या पेटीतली फळ बाहेर काढायची, त्यांचा वास घ्यायची आणि परत आत ठेवून द्यायची. मधेच बाबांना विचारायची, हे कधि पिकणार? बाबा फक्त हसायचे. मी पण जवळ जावून त्यांचे निरीक्षण करायचॊ. आई मला त्यांना हात नाही लावून द्यायची.
एका संध्याकाळी आत्या आणि काका आले होते. मी त्यांच्याबरॊबर खेळत हॊतॊ. तेव्हढ्यात तिने पिशवीतून एक पिवळे पिवळे धम्म फळ काढले आणि माझ्यासमॊर ठेवले. बाकीची पिशवी आईकडे दिली. हे पण त्या पेटीतल्या फळांसारखेच हॊते. फक्त थोडे मॊठे आणि जास्त पिवळे. आई म्हणाली, अरे वा! आले वाटतं देवगडहून तुमचे हापूस आंबे. आता मला कळलं या फळांना ’हापूस आंबे’ म्हणतात.
मी पटकन तॊ आंबा हातात उचलायला गेलॊ पण एवढा मोठा आणि जड हॊता तॊ की काकांनी त्याला खालून आधार दिला तेव्हा कुठे उचलला गेला. मी बराच वेळ खेळलॊ त्या आंब्याबरॊबर.
आई रॊज रस तरी काढायची नाहीतर बाबा आंबा कापून त्याच्या फॊडी करायचे. मला फक्त अर्धिच वाटी रस द्यायची. मला आणखी हवा असायचा तर म्हणायची, शनू, आंबा उष्ण असतॊ, जास्त खल्लास तर तुला त्रास हॊईल. तू मॊठा झाल्यावर खा हा भरपूर आंबा.

परवाच मी आजीबरॊबर बाजारात गेलॊ हॊतॊ तेव्हा मला ’हापूस आंबे’ दिसले. म्हणजे आमच्या घरी पण येतील मागच्या वर्षीसारखे. आता तर मी मॊठा पण झालॊय. मला वरचे चार, खालचे चार आणि दॊन दाढा असे दहा दात पण आलेत.

हं, मी आता भरपूर आंबे खाणार.मंगळवार, मार्च ०९, २०१०

जिव्हाळ्याचा विषय


आई म्हणते, माझा आणि बाबांचा जिव्हाळ्याचा विषय एकच आहे 'झोप'. ते खरं ही आहेच म्हणा. आम्हाला कधिही, कुठेही, कशीही झोप लागते.


बाबांनी गाडी सुरु केली आणि AC चा गार गार वारा लागला की माझे डोळे आपोआप जड व्हायला लागतात आणि मी झोपेच्या स्वाधीन होतो.रात्री सुद्धा कधि कधि अंगा घालेपर्यंत मी ढाराढूर झालेला असतो. मग आई मला झोपेतच उलटा पालटा करून झोपायचे कपडे घालते आणि असं इस्त्रित झोपवते.


मागे एकदा शॉपिंग करायला आई आणि मावशी मला मोठ्या हौसेने बिग बझार मध्ये घेवून गेल्या. गर्दी कमी असेल म्हणून आम्ही सकाळी साडे दहा वाजताच तिथे पोचलो. मी पण नुकतीच आंघोळ केली होती, गरम गरम दु दु प्यायले होते. तिथे आत छान गार हवा लागत होती. झालं, व्हायच तेच झालं, ब्रह्मानंदी लागली टाळी. आता मला असं झोपलेलं उचलून घेवून शॉपिंग कसं करणार? म्हणून माझे थोडे फोटो काढून दोघी बिचार्‍या अकरा वाजताच घरी वापस :)


कधि कधि मी रूसुन सोफ्यावर उलटा पडून रहातो आणि त्या मऊ मऊ सोफ्यावर रंगित फुलं बघताना मी विसरूनच जातो की मी रूसलोय आणि मला झोपच लागते तिथे,


मी आणि बाबा टीव्हीवर गाण्यांची व्ही सी डी बघत होतो, छान छान गाणी आहेत त्यात. चांदोबा चांदोबा भागलास का? शेपटीवाल्या प्राण्यांची भरली होती सभा, माऊची पिल्ले, बेडकीच्या पिल्लाने बैल पाहिला. इतकी मस्त गाणी होती पण नेहेमीप्रमाणेच झाल. आई जेव्हा हॉलमध्ये बघायला आली तेव्हा बाबा गाणी ऐकत होते आणि मी तर केव्हाच,


माझ्या आईला 'ओपन हाऊस'ची पावभाजी खूप आवडते म्हणून आम्ही एका शनिवारी तिथे गेलो होतो. माझ्यासाठी साधा डोसा मागवला होता कारण नाही तर मी आईला पावभाजी खाऊन दिली नसती. डोसा पटकन बनतो वाटतं, पहिला तोच आला टेबलवर. मी थोडा थोडा खात होतो. पोट भरत आलं तसे डोळे आपोआप मिटायला लागले. आजी नेहेमी म्हणते, जेवल्या जेवल्या झोप येते कारण अन्नाचा सुद्धा कैफ येतो. मला पण बहुतेक तसच झालं. नशिबाने शेजारचे टेबल रिकामे होते त्यामुळे मी त्याच्यावर अशी ताणून दिली आणि आईने पण पावभाजी नक्कीच एन्जॉय केली असणार.आता सुद्धा मी झोपलेला आहे म्हणून आई हे लिहू शकली, कळलं ना!

शुक्रवार, मार्च ०५, २०१०

पहिली मम्मम्आज आई सकाळपासून एव्हढी साफसफाई का बरं करत्ये? आजी पण सकाळीच आली, येताना भरपुर डबे आणि काय काय खाऊ घेवुन आली. आईने जयेशमामाला फोन केला आणि सांगितले, बरोब्बर दुपारी १२.३०वा. ये रे उशिर नको करु कारण तू आल्याशिवाय कार्यक्रम सुरु करता येणार नाही.

आता कळलं काहितरी कार्यक्रम आहे घरात. तरीच एव्हढी गडबड चालली आहे.

माझ्या दोन्ही मावशांचा अजुन पत्ता नव्हता आणि बाबा बाहेर गेले होते, त्यामुळे मला आईने किचनमध्येच एका दुपट्यावर ठेवले. आजुबाजुला बर्‍याच वस्तु असल्यामुळे मी लगेच उपडा वळलो, बाबांच्या भाषेत King Cobra Position मध्ये आलो. मी पाहिलं आई एका छान चकाकणार्‍या ताटात छान छान खाऊ वाढत होती. त्या ताटात तशाच चकाकणार्‍या दोन वाट्या आणि चमचा पण होता.मी हे सगळ बघत असतानाच आई म्हणाली, शनु, आज तुझी पहिली मम्मम् मोठ्या ताटात आमच्यासारखी. आजी म्हणाली, 'उष्टावण' म्हणायच त्याला. आज आजी कठीण भाषेत बोलत होती. मला खुप आनंद झाला पण मी जेवणार कसा?

तेव्हढ्यात जयेश मामा आला. त्याने मला एक कापडाचा बॉल दिला मी चावुन बघितला एकदम मऊ मऊ होता. थोड्या वेळाने रुपामावशी आणि शमुमावशी पण आल्या. बाबा आल्यावर सगळे हॉलमध्ये जमलो. माझं लक्ष माझ्या ताटाकडेच होतं.

आईने मला नेहेमीसारखं ओवाळलं मग आजीने मामाला सांगितले या सोन्याच्या अंगठीने आर्यनला खीर चाटवं. मी चाटुन पुसुन खल्ली अंगठीची खीर. छान होती.
मग बाबांनी लाडू दीला मला खायला, माझ्या तोंडात शिरलाच नाही, मी त्याला चाटुन बघितलं गोड गोड लागला मला.


आजीने पुरणपोळीचा छोटुसा घास भरवला तो मात्र मला मस्त खाता आला.


शमुमावशीने भरवलेलं श्रीखंड पण मला खूप आवडलं. आईने मला गोडाच्या शिर्‍याचा घास दीला. चमच्याने वाटीतली सगळी खीर पण भरवली. मी छोटासा वरणभात पण खल्ला. माझं पोट खूप भरलं. माझ्या ताटात कितीतरी पदार्थ होते श्रीखंड, पुरी, खीर, लाडू, शिरा, पुरणपोळी, वरणभात, लिंबू, दही, लोणचं, चटणी, कोशिंबीर, पापड, फेणी, पुलाव बापरे!


आता कळलं ही मोठी माणसं भरडी का खात नाहीत!

मंगळवार, मार्च ०२, २०१०

बाबांच ऑफिस

बाबा सांगत होते आईला, मी अ‍ॅडमिन् मधुन स्पेशल परवानगी घेतली आहे ऑफिसच्या फॅमिली व्हिजिटसाठी.
गोरेगावच्या काकाआजोबांकडे जाताना रस्त्यातच बाबांचे ऑफिस आहे. सकाळी साडेनऊ वाजता आम्ही तिथे पोचलो. एका निळे कपडे आणि निळी टोपी घातलेल्या माणसाने गाडी चेक केली आणि एका कागदावर बाबांची सही घेतली. त्याने एक लाल गळ्यातले दीले ज्याला एक छोटा चौकोन होता. ते आईने गळ्यात घातले. मग आम्ही गाडी खाली पार्क करुन ऑफिसमध्ये आलो. मोठे कारंजे होते तिथे. छान काचेच्या भिंती, छान छान पुस्तकं, चित्रे आणि मऊ मऊ खुर्च्या पण होत्या. बाबांनी मला एका खुर्चीत बसवले होते. बाबा मला म्हणाले, हे रिसेप्शन आहे.
बराच वेळ मला कोणी उचलुन घ्यायचं ते ठरत नव्हतं, शेवटी बाबांनीच मला उचलुन घेतले.
तिथुन आम्ही डोम एरियात गेलो. मोठा काचेचा डोम होता आणि त्याच्या बाजुने पाणी सोडले होते. त्यात केवढे छान रंगित मासे पण होते. मी आणि बाबा त्याच्या कडेलाच बसलो होतो पण माझा हात पोचत नव्हता पाण्यापर्यंत.

तिकडे आजुबाजुला खेळायला केवढी जागा होती. मग आम्ही लॉनवर फिरलो, झाडसुद्धा बघितली. बाबांच्या ऑफिसच्या शेजारी मोठा मॉल पण आहे. आई म्हणाली, नंतर तिकडे जावुया कारण तिथे मॅकडॉनल्डस् आणि फूड बझार होते.हे सगळ बघुन आम्ही बाबा जिथे बसतात तिथे जावुन आलो. बाबांची चाकांची खुर्ची मला खुप आवडली. आई म्हणाली, तिच्या ऑफिसमध्ये यापेक्षा छान Executive chairs आहेत त्यांना बसायला. आईचे ऑफिसपण बघायला जायला हवं.

एवढं छान आहे इथे बाग आहे, रंगित मासे आहेत, खेळायला भरपुर जागा आहे तरी पण बाबांना ऑफिसला जायचा कंटाळा कसा येतो काय माहीत?