आई मला नविन अंगा घालत होती आणि म्हणाली, 'शनु आज तुझं बारसं आहे, तुला नविन नाव मिळणार'. अरेच्च्या! म्हणजे माझेच कहितरी आहे आज. तरीच मला नटवत आहेत. पण मला काय करायचेय नविन नाव, आईचा 'शनु', बाबांचा 'ढबुल्या', आजीचा,'राणाप्रताप' आणि आईच्या मैत्रीणींचा, 'Smallie' एव्हढी नावं असताना.
आजुबाजुला रंगीत फुगे,फुलं होती मी छान खेळत होतो पाळण्यात. मग मला आजी आणि दुसरी आजी यांनी 'गोविंद घ्या कोणि गोपाळ घ्या' म्हणत पाळण्याच्या वर खाली फिरवीले, मज्जा आली. मग आईने हळूच माझ्या कानात सांगीतले, "आर्यन"
मी मावशीच्या मांडीवर पडुन होतो, आई शेजारी बसली होती आणि बाबा फोटो काढत होते. मग एक एक काकु, मामी , सगळ्या जमलेल्यांनी मला काय काय द्यायला सुरुवात केली. प्रत्येक जण एकेक कपडा घेउन माझ्या अंगावर ठेवी, दुपटे पांघरुन दाखवी, टोपरे पण डोक्याला लावत. कंटाळा आला मला, मी आधी रडून दाखवले, शु शु पण केली नविन कपड्यांवर तरी काही नाही, थोड्या वेळ थांबत की पुन्हा आपले सुरु. शेवटी मीच झोपुन गेलो,
जाग आली तेव्हा आईच्या कुशीत होतो. घरी पण रोजचीच सगळी माणसं दिसत होती.
संपलं वाटत 'बारसं'