समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

गुरुवार, नोव्हेंबर ०४, २०१०

दिन दिन दिवाळी

परवा आईने सुट्टी घेतली होती खास दिवाळीचा फराळ बनवायला. मदतीला होती आजी आणि मी स्वतः. सगळ्यात आधी करंजी केली. मला लगेच चव बघायची होती, मग आईने सांगितले या दोन करंज्या देवासमोर ठेव, देवबप्पाला खाऊ. मग तू खा. नविन घरातले देव अजुन चौरंगावरच ठेवलेत देव्हारा बसवला नाहीये ना म्हणून. त्या चौरंगावर देवासमोर ताटली ठेवायला जागाच नव्हती मग मी सगळ्या देवांचे तोंड डाव्या बाजूला वळवले आणि त्याच्यासमोर करंज्या ठेवल्या.

नंतर जेव्हा आजीने आईला विचारले या देवांची तोंडे या बाजूला कशी झाली? आईला पण समजेना असं कसं झाल? जेव्हा त्यांना समोरच्या करंज्या दिसल्या तेव्हा सगळ्याचा उलगडा झाला आणि मला परत हे काम न सांगण्याचा पण निर्णय घेण्यात आला. असो.

मग आई चकल्या पाडून देत होती आणि आजी तळून घेत होती, मी टेस्टिंगचे काम करत होतो. मध्येच तळलेल्या कुठल्या आणि कच्च्या कुठल्या ते मला समजायचे नाही. त्यामुळे माझ्या हातुन चुकुन काही चकल्या मोडल्या गेल्या आणि माझी रवानगी दुसर्‍या खोलीत झाली. पण रडून रडून मी पुन्हा त्यांना सामिल झालो.

मी दुपारी झोपलो तेव्हा त्यांनी चिवडा करून घेतला.

संध्याकाळी आमच्या सगळ्या खिडक्यांमधले आकाशकंदिल लावले. नविन LED ची ट्युब लावली. मस्त चकमक चकमक करत होती ती.

उद्यापासून तिन दिवस आई पण घरी आणि बाबा पण घरी त्यामुळे मज्जाच मज्जा येणार आहे. मी भरपूर खाऊ खाणार, फुलबाज्या आणि केपं वाजवणार, नविन नविन कपडे घालून फिरायला जाणार. खूप धमाल करणार.

मी तर दिवाळी साजरी करायला सुरुवात केली सुध्दा,

तुम्ही सगळे पण अशीच मजा करा, दिवाळीचा खाऊ खा, फटाके वाजवा.
शुभ दिपावली!