समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

शनिवार, मार्च १३, २०१०

हापूस आंब्याची गोष्ट सांगू?

सकाळी सकाळी मला आमच्या घरात एक नविन वस्तू दिसली. चौकोनी आकाराची, लाकडाच्या पट्ट्या असलेली आणि पिवळे गवत भरलेली एक पेटी हॉलमध्ये ठेवलेली हॊती. चिपळूणचे आबा पण आले हॊते. बहुतेक त्यांनीच आणली होती ती पेटी. आबांच्या पिशवीत आणखीन काय काय खाऊ हॊता ऒले काजू, फणसाचे गरे, करवंद. आबांनीच दाखवले सगळे.

आबा गेल्यावर मी त्या पेटीला धरून उभा राहीलॊ पण मला आतलं काहीच दिसत नव्हतं. बाबांनी कधितरी ती पेटी स्वयंपाकघरात नेवून ठेवली. थोड्या वेळाने आईने ढकलत ढकलत ती ज़ोपायच्या खॊलीत नेली. मला कळत नव्हत हे काय चाललयं? मी वाट बघत हॊतॊ कधि एकदा ती पेटी उघडते.
संध्याकाळी बाबांनी त्यांच्या टूल कीटमधल्या पकडीने त्या पेटीच्या वरच्या लाकडी पट्ट्या काढल्या आणि गवत पण बाजूला केले. मी बघितले त्या पेटीत हिरव्या पिवळ्या रंगाचे काहीतरी हॊते. आईने त्यांना बाहेर काढले तेव्हा मला ती मोसंबीची फळ वाटली. पण मॊसंबी तर गॊल असते या फळांचा आकार थॊडा वेगळा होता. नकीच छॊटे छॊटे पपई असणार. तेवढ्यात आईने ती फळ परत आत ठेवून दिली आणि वर गवत लावून ठेवलं.

रोज रात्री आई त्या पेटीतली फळ बाहेर काढायची, त्यांचा वास घ्यायची आणि परत आत ठेवून द्यायची. मधेच बाबांना विचारायची, हे कधि पिकणार? बाबा फक्त हसायचे. मी पण जवळ जावून त्यांचे निरीक्षण करायचॊ. आई मला त्यांना हात नाही लावून द्यायची.
एका संध्याकाळी आत्या आणि काका आले होते. मी त्यांच्याबरॊबर खेळत हॊतॊ. तेव्हढ्यात तिने पिशवीतून एक पिवळे पिवळे धम्म फळ काढले आणि माझ्यासमॊर ठेवले. बाकीची पिशवी आईकडे दिली. हे पण त्या पेटीतल्या फळांसारखेच हॊते. फक्त थोडे मॊठे आणि जास्त पिवळे. आई म्हणाली, अरे वा! आले वाटतं देवगडहून तुमचे हापूस आंबे. आता मला कळलं या फळांना ’हापूस आंबे’ म्हणतात.
मी पटकन तॊ आंबा हातात उचलायला गेलॊ पण एवढा मोठा आणि जड हॊता तॊ की काकांनी त्याला खालून आधार दिला तेव्हा कुठे उचलला गेला. मी बराच वेळ खेळलॊ त्या आंब्याबरॊबर.












आई रॊज रस तरी काढायची नाहीतर बाबा आंबा कापून त्याच्या फॊडी करायचे. मला फक्त अर्धिच वाटी रस द्यायची. मला आणखी हवा असायचा तर म्हणायची, शनू, आंबा उष्ण असतॊ, जास्त खल्लास तर तुला त्रास हॊईल. तू मॊठा झाल्यावर खा हा भरपूर आंबा.

परवाच मी आजीबरॊबर बाजारात गेलॊ हॊतॊ तेव्हा मला ’हापूस आंबे’ दिसले. म्हणजे आमच्या घरी पण येतील मागच्या वर्षीसारखे. आता तर मी मॊठा पण झालॊय. मला वरचे चार, खालचे चार आणि दॊन दाढा असे दहा दात पण आलेत.

हं, मी आता भरपूर आंबे खाणार.



११ टिप्पण्या:

  1. अरे वा.. इतक्या लवकर आंबे आलेत? मला पाठवलं पाहिजे कोणाला तरी देवगडला.
    अजुन तर उन्हाळा पण सुरु झालेला नाही व्यवस्थित.. आंबे खाउ नकोस अजुन काही दिवस.. :)

    उत्तर द्याहटवा
  2. पोस्टमध्ये जे आंबे लिहिले आहेत ते मागच्या वर्षीचे आहेत. तुमची पण देवगडला झाडं आहेत की काय आंब्याची?
    बाजारात आंबे दिसायला सुरुवात झाली आहे, quality कशी आहे कोणास ठावुक?
    सोनाली
    आंबे खाऊ नको!:( :( :(
    आर्यन

    उत्तर द्याहटवा
  3. "मला वरचे चार, खालचे चार आणि दॊन दाढा असे दहा दात पण आलेत. " अरे वाह....खा आंबे आता मनसोक्त..अन रसाने माखलेल तोंड याचे पण फोटो टाक मस्त पैकी....

    उत्तर द्याहटवा
  4. या वर्षी मी भरपूर आंबे खायचे ठरवले आहे, आईने दिले पाहिजेत पण!

    उत्तर द्याहटवा
  5. आईला सांग ना सुहासदादा पाठवून देईल आंबे जर आईने शनूला नाही दिले तर..

    उत्तर द्याहटवा
  6. आर्यन, तुझी बाबा चंगळ आहे. आता यावर्षी मस्त गोबरे गाल माखलेला फोटो काढून घे आईकडून. मला देशील का रे एक छोटासा आंबा?प्लीज... मी आईकडे वशिला लावेन ना तुझा... :).

    उत्तर द्याहटवा
  7. सुहासदादा,
    Thank you! जर आईने नाही दिले तर मी तुला आईचे नाव सांगिन हा!

    उत्तर द्याहटवा
  8. श्रीताई,
    फोटो काढण्यात आईचा हात कोणीच धरू शकत नाही, त्यामुळे माझा तसा फोटो नक्की निघेल. तू आमच्या घरी आलीस ना तर आई हमखास आंबा कापेल तुझ्यासाठी.

    उत्तर द्याहटवा
  9. अरे वा आर्यन, दहा दात? आईला संग मला आता एका दातासाठी एक आंबा पाहिजे :)

    उत्तर द्याहटवा
  10. देवेंद्रदादा,
    मजा तर तुम्हा दादा लोकांची, मला तर आई देइल तेव्हा मी खाणार.

    हेरंबदादा,
    आईने दहा दातांना एक आंबा दिला तरी बास मला :)

    उत्तर द्याहटवा