समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

मंगळवार, जानेवारी १९, २०१०

एक महिन्याचा

आज ८ ऑक्टोबर मी आज एक महिन्याचा झालो, आजीने नक्कीच काही तरी celebration ठरवले असणार. मालिशवाल्या मावशीनी पण चांगले मळून काढले मी मोठा (एक महिन्याचा) झालोच्या नावावर. मस्त गरम गरम पाण्याने आंघोळ झाली, ओव्याची धुरी पण घेउन झाली. मावशी मला कपडे घालत होत्या तेव्हाच आजी ताम्हनात निरांजन, सुपारी, दुर्वा, कापुस, चांदीची चमचा वाटी असे सगळे सहित्य घेवुन आली. मला कळेना आता या सगळया मिळून मला काय करणार आहेत ते!

मग आजीने मला मांडीवर घेतले, आई मला औक्षण करु लागली, आजीने आईला सांगितले, आता याच्या डोक्यावर दुर्वा ठेव (मनात म्हण) दुर्वांसारखा वंशविस्तार होउदे. मग माझ्या डोक्यावर कापुस ठेवायला सांगुन मला म्हणाली, कापसासारखा म्हातारा हो बरं का! हे होतय तेव्हढ्यात आजोबा म्हणाले, त्याला धारणावर चढवा हो! आईने माझ्या मनातला प्रश्न विचारला,' धारणा वर चढवा म्हणजे काय आणि कशासाठी?'

आजोबांनी सांगीतले, धारण म्हणजे घरातला मुख्य खांब आणि त्याच्यावर चढवायचे कारण त्याच्या सारखा उंच, मजबुत आणि घरादाराचा आधारस्तंभ होउदे हा माझा नातु.

आता मला खांबावर चढवणार आहेत हे ऐकले आणि मी झोपेचे सोंग घेतले, म्हणजे हे संकट टळेल.


पण नाहीच सगळ्यांनी मिळुन माझे पाय खांबावर चढवल्यासारखे केलेच.

माझ्या एक महिन्याच्या वाढदीवसाला केलेली खीर फक्त एक बोट माझ्या तोंडाला लावुन बाकीच्यांनी फस्त केली.

1 टिप्पणी: