समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

मंगळवार, जून ०८, २०१०

न लटकता लोकलने

बाबा चारचारदा आईला सांगत होते नीट ने त्याला, पूर्ण थांबल्याशिवाय चढु नको, जास्त सामान नेवू नको, वगैरे वगैरे.या बोलण्यावरून मला एव्हढे कळले की आई आणि मी दोघेच कुठेतरी जात आहोत. चार वाजता रविनाताई, आई आणि मी आवरून तयार झालो. रिक्षेत बसल्यावर आईच्या बोलण्यातुन मला कळले की आम्ही डोंबिवलीला चाललो आहोत, लोकल ट्रेनने. मला किती आनंद झाला म्हणून सांगू!

का म्हणजे?

माझ्या आईने एक ठराव पास केला होता, मी एक वर्षाचा होईपर्यंत मला लोकलने कुठेही न्यायचे नाही. माझी आई काय ठरवेल सांगता येणार नाही. त्यामुळे मी आमची गाडी, रिक्षा, बस, घोडागाडी, विमान हे सगळ बघितलं होत पण लोकल काही पाहिली नव्हती.


आईला बरेचदा बाबांना सांगताना मी ऐकले होते की मी लोकलमधे हे कानातले घेतले, हा छोटा आरसा घेतला, आज कोणीतरी माझ्या पायावर पाय दिला, आज लोकलमधे असं झालं आणि आज लोकलमधे तसं झालं. त्यामुळे ही लोकल कोण आहे आणि ती एकटी हे सगळं कस करू शकते हे पहायची मला खूप उत्सुकता होती.


आम्ही एकदाचे स्टेशनवर पोचलो. कुपन्स पंच केली आणि प्लॅटफॉर्मवर जावून उभे राहिलो. मी सगळीकडे पहात होतो, नुसती माणसच माणसं होती सगळीकडे. आईने मला उचलुन घेतले होते. मधेच एक खूप मोठा आवाज आला, मी घाबरून आईला घट्ट धरून ठेवले. आमच्या पलिकडल्या प्लॅटफॉर्मवर एक गाडी थांबली ती एव्हढी लांब होती की तीची सुरुवात कुठुन झाल्ये आणि संपल्ये कुठे तेच दिसत नव्हते. मग आम्ही आधिपासूनच उभ्या असलेल्या एका तसल्याच लांब गाडीत जावुन बसलो. तेव्हा आई म्हणाली, शनु, या गाडीला लोकल ट्रेन म्हणतात. आता कळलं, लोकल एव्हढ्या सगळ्या गोष्टी एकटी कशी करते.














आम्ही बसलो ती लोकल एकदम रीकामी होती. मस्त खिडकीजवळच्या सीटवर बसलो होतो. बर्‍याच वेळानंतर आमची लोकल सुरू झाली. त्या लोकलमध्ये छोटी छोटी दुकानच होती. बागड्या, कानातले, पिनांचे दुकान. टिकल्यांचे दुकान. मग एक आजीबाई चिकू घेवुन आली टोपलीभर.


लोकल सुरू झाल्यावर छान वारा आला आणि आमची लोकल एकदम धाडधाड जात होती, मला जाम मज्जा वाटत होती. आजूबाजूच्या सगळ्या जणी माझ्याकडे बघून उगीचच हसत होत्या. गाडी मधे मधे थांबायची मग गाडीतल्या काही बायका खाली उतरायच्या काही गाडीत चढायच्या. मला एक प्रश्न पडला, की ड्रायव्हरला कसं बरोब्बर कळायचं की या सगळ्यांना कुठे उतरायचे आहे?


तसेच गाडीतली दुकानं पण सारखी बदलत होती, रुमालांचे दुकान पण होते तिथे. मग एक खाऊचे दुकान आले पॉपकॉर्न, वेफर्स, लिमलेटच्या गोळ्या, आवळासुपारी, जीरा गोळी, चॉकलेट्स, वगैरे. आईने श्रीखंडाच्या गोळ्या घेतल्या. मी कडकड चावून दोन-तिन गोळ्या खावून टाकल्या एकदम. मला आणखी खाऊ हवा होता पण आईने घेतला नाही.


आणखी एक स्टेशन गेले आणि खिडकीतल्या वार्‍याने मला मुळी झोपच यायला लागली. तसाच आईच्या मांडीत झोपुन गेलो. त्यामुळे मला डोंबिवली कधि आलं, रिक्षेत कधि बसलो आणि आत्याच्या घरी कधि पोचलो तेच कळलं नाही.

आई उगाच कंटाळते लोकलने जायला, मला तर लोकल ट्रेन खूप खूप आवडली, मज्जा येते लोकलमध्ये.

२१ टिप्पण्या:

  1. अले वा! एका माणसाने आज लोकल पण पाहिली? मज्जा आली ना! तुला माहिते का? मी पण माझ्या बाबांच्या बरोबर लोकमधे बसले होते ना, तेव्हा झोपूनच गेले. पण जेव्हा लोकल पळत होती ना, तेव्हा खिडकीतून रूळ एकमेकांना भेटायला कसे धावतात ते बघायला खूप मज्जा आली होती. पण तू कधी तसं करू नकोस हं. चक्कर येते त्याच्याने. आणि माहिते का? रूळाच्या बाजूला मोठे मोठे दिव्याचे खांब होते, लोकल दिसली रे दिसली की ते पटकन मागच्या मागे पळूनच जायचे. मलासुद्धा खूप आवडते लोक. पण आई ज्या लोकलने रोज जाते ना, ती इतकी रिकामी नसते. खूप खूप गर्दी असते म्हणून तर ती लोकलने रोज नेऊ शकत नाही तुला.

    उत्तर द्याहटवा
  2. कांचनताई,
    अगं वारा एव्हढ्या जोरात येत होता की माझे डोळे सारखे मिटत होते त्यामुळे खिडकीच्या बाहेर मी जास्त बघत नव्हतो. खाऊचे दुकान आल्यापासून तर मी सगळ विसरूनच गेलो बघ.
    तू म्हणतेस तसच असेल म्हणूनच आई मला नेत नाही नेहेमी नेहेमी लोकलने.

    उत्तर द्याहटवा
  3. >>> मला एक प्रश्न पडला, की ड्रायव्हरला कसं बरोब्बर कळायचं की या सगळ्यांना कुठे उतरायचे आहे?

    हे हे आर्यन.. तुझं वाचुन मलाही हाच प्रश्न आत्ता पडला ;-)

    आणि इतकी रिकामी लोकल तुला मिळालीच कशी रे... मी मुंबईला दादर ते ठाणे प्रवास केलेला मला चांगलाच आठवतोय...

    उत्तर द्याहटवा
  4. अरे वा व्वा.. छानच. शनु चक्क लोकलमध्ये बसला तर. आईने अजून असे काय काय ठराव पास केले आहेत रे ? :)

    >> त्यामुळे ही लोकल कोण आहे आणि ती एकटी हे सगळं कस करू शकते हे पहायची मला खूप उत्सुकता होती.

    हा हा.. आता कळला लोकलचा महिमा ? पण आई ऑफिसला जाते तेव्हा तू जाऊ नकोस तिच्याबरोबर. कारण तेव्हाची लोकल जामच भयानक असते. गर्दी, घाम, धक्काबुक्की. तू आपला मस्त गाडीतूनच जात जा कसा.. :)

    उत्तर द्याहटवा
  5. चला म्हणजे आता तुला खरा मुंबईकर म्हणायला हवा नाही का आर्यन...आणि लोकलमध्ये तुला तुझ्यासारखं कुणी लहान पिलु दिसलं की नाही???

    उत्तर द्याहटवा
  6. अरे वा बाळा, मस्त सफर केलीस तू...ती पण विंडो सीट, सही है :)

    >> त्यामुळे ही लोकल कोण आहे आणि ती एकटी हे सगळं कस करू शकते हे पहायची मला खूप उत्सुकता होती. :)

    आता कसा वाटला बघून लोकलला? पण गर्दीच्यावेळी चुकुन जाउ नकोस रे..तू बसला आहेस तिथे चार-चार जण अवघडून बसतात रे :(

    उत्तर द्याहटवा
  7. आनंददादा,
    मला अजुनही कळलं नाहीये ड्रायव्हरला कस समजतं.
    अरे ही ठाण्याहून सुटणारी लोकल होती म्हणून मस्त रिकामी होती.

    उत्तर द्याहटवा
  8. हेरंबदादा,
    आई काय काय ठराव पास करते, काय सांगु तुला आता.
    मला खूप मज्जा आली लोकलमध्ये. आई नेणारच नाही मला सकाळच्या वेळी लोकलने.

    उत्तर द्याहटवा
  9. अपर्णाताई,
    हो मग! मला लोकल खूप आवडली.
    हो माझ्यासारखी दोन तिन लहान बाळं होती. एक बाटलीने दुदु पण पित होते.

    उत्तर द्याहटवा
  10. सुहासदादा,
    माझी सफर एकदम आरामशीर होती. मला एकट्याला खिडकी मिळाली, स्वतंत्र.
    लोकल खूपच मस्त होती आणि मोठी होती.
    आई पण सांगते ना सकाळी आणि संध्याकाली पाय ठेवायला जागा नसते लोकलमध्ये, मी जाणारच नाही अशा वेळी.

    उत्तर द्याहटवा
  11. अरे वाह लोकल का? तुझा हा दादा अजून लोकल मध्ये बसला नाहीये..

    उत्तर द्याहटवा
  12. एकंदरीत छान झाली युवराजांची लोकलची सफ़र...नाहितर मुंबईच्या लोकलची सफ़र म्हणजे....

    उत्तर द्याहटवा
  13. सागरदादा,
    तू अजुन लोकलमध्ये बसला नाहियेस? मला खरच वाटत नाही.

    उत्तर द्याहटवा
  14. देवेंद्रदादा,
    माँसाहेब बरोबर असल्यावर काय युवराजांची ऐशच असते.

    उत्तर द्याहटवा
  15. काय रे काय चालू आहे सध्या ? खूप दिवसात काही खबर नाही !

    उत्तर द्याहटवा
  16. पुढच्या पोस्टची वाट बघत आहोत.... अजून खूप खूप प्रवास कर..

    उत्तर द्याहटवा
  17. पिल्लू कुठे आहेस रे तु अश्यात?
    किती दिवस झाले गायब झालास?

    उत्तर द्याहटवा
  18. वेलकम टू लोकल दुनिया युवराज. चला आता ओळख झालीये आणि मज्जाही आली. विंडो सीट मिळाल्याने आर्यनला वारा खायला मिळाला. रूळांची अदलाबदलीही पाहता आली. सहीच.

    उत्तर द्याहटवा
  19. आईला हल्ली लिखाणाचा सुद्धा कंटाळा येतो काय???? आहे कुठे तुझी आई??? काम खूपच वाढले आहे काय??? आता आईला वेळ नाही तर तूच लिखाण पुढे सुरु ठेव.. :)

    उत्तर द्याहटवा
  20. हो, हल्ली आई लिखाणाचा खूप कंटाळा करते.

    उत्तर द्याहटवा