समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ॥ जयाची लिला वर्णिती लोक तीन्ही । नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥

मंगळवार, सप्टेंबर ०७, २०१०

८ सप्टेंबर, मागच्या वर्षीचा

मला अचानक ८ सप्टेंबरची का आठवण झाली?
पटकन उत्तर हवं असेल तर फोटो पहा आणि सावकाश कळलं तरी चालणार असेल तर पोस्टच वाचा.
तर मागच्या ८ सप्टेंबरची सुरुवात अशी झाली. आंघोळ झाल्यावर आजीने आणलेला नविन ड्रेस घातला मग आईच्या मांडीवर बसलो. आजीने मला औक्षण केले, माझ लक्ष मात्र खाली ठेवलेल्या ढोकळा आणि जिलबीकडे होतं :)

छान छान खाऊ खावुन दुपारी मस्त झोपलो. झोपुन उठल्यावर बघतो तर काय अजुन एक नविन ड्रेस. मावशीने मला जीन्सची पॅंट आणली होती. माझी पहिली जीन्स. मग मी जीन्स पॅंट आणि टी शर्ट घालुन तयार झालो.


मला कळेचना की आमची सगळी गॅंग नक्की कुठे चालली आहे. एका ठिकाणी सगळे गाडीतुन उतरलो. आमच्या बरोबर भरपुर सामान होते. मोठ्या पिशव्या, बॉक्स, इ. तिथे आत गेल्यावर बघतो तर काय मस्त सजावट केलेली, फुगे लावलेले, आणि गंम्मत म्हणजे भिंतीवर सगळीकडे माझेच फोटो लावले होते.
हळु हळु एक एक दादा, काका, मावशी, माझे मित्र मैत्रिणी सगळे जमले तिथे. प्रत्येक जण यायचा मला शेकहॅंड करायचा आणि काहीतरी रंगीबेरंगी बॉक्स माझ्या हातात द्यायचे. मग आई किंवा मावशी माझ्या हातातुन काढून घ्यायचे, मी जोरात ओरडायचो, मला हवा असायचा तो बॉक्स माझ्या हातात.
तिथे भरपुर जणं जमल्यावर मला बाबांनी उचलुन घेतले. आई, बाबा आणि मी स्टेजवर गेलो. तिथे दोन दोन केक होते. सगळ्यांनी एका सुरात गाणे म्हटले, 'HAPPY BIRTHDAY TO YOU, AARYAN'
आई बाबांनी माझा हात धरुन केक कापला. कुणी मला भरवला तर कुणी मला असा रंगवला.





माझ्या मित्र मैत्रिणी आणि ताई दादांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या.

मग छोट्या मानसीताईने जादूचे प्रयोग करुन दाखवले.

ते बघता बघता मला आणि माझ्या मित्राला झोपच आली. बरं झालं आईने माझं अंथरुण पांघरूण आणलं होतं बरोबर. मित्राला पण अचानक झोप आल्यामुळे एकाच अंथरूणावर कसे बसे झोपलो आम्ही दोघं. आई म्हणाली, पुढच्या वेळी लक्षात ठेवायला हवं, वाढदिवसासाठी बोलवलेल्या गेस्टसाठी पण अंथरुण पांघरूण आणायला हवं.

मला जेव्हा जाग आली तेव्हा मी काय पाहीलं माहीत्ये? आई बाबा मस्तपैकी श्रीखंड पुरी, कॉर्न टिक्की, छोले, पनीर मसाला, पुलाव, केक असे छान छान खाऊ खात होते. मी उठलो आणि डायरेक्ट आईच्या पुढ्यातच जावून बसलो. माय फेव्हरेट श्रीखंड पुरी खायला.

असा हा मागच्या वर्षीचा ८ सप्टेंबर उद्या परत येणार आहे.

गुरुवार, ऑगस्ट २६, २०१०

काय करु आणि काय नको????



मला माहित्ये खूssssssssssप दीवसांत मी ब्लॉगवर फिरकलोच नाहीये दुसर्‍यांच्या आणि स्वतःच्या पण.
आईबाबानी मोठे घर घेतले, मला खेळायला, अभ्यास करायला, वगैरे वगैरे. मग जुन्या घरातील सामानाचे नविन घरात शिफ़्टींग, नविन घरात आईच्या दृष्टीने हा पसारा, माझ्या मते खूप वेगवेगळी खेळणी.
रोज मला नविन खेळणे मिळते आहे कुकरपासून सोफ्याच्या कुशनपर्यंत.


आता आईने सगळे आवरायला घेवुन मला मदतीला घेतले आहे त्यामुळे मला अगदी काय करु आणि काय नको असे होते आहे.
आता एकदा सगळं सामान व्यवस्थित लावुन झालं की आलोच मी परत.

मंगळवार, जून ०८, २०१०

न लटकता लोकलने

बाबा चारचारदा आईला सांगत होते नीट ने त्याला, पूर्ण थांबल्याशिवाय चढु नको, जास्त सामान नेवू नको, वगैरे वगैरे.या बोलण्यावरून मला एव्हढे कळले की आई आणि मी दोघेच कुठेतरी जात आहोत. चार वाजता रविनाताई, आई आणि मी आवरून तयार झालो. रिक्षेत बसल्यावर आईच्या बोलण्यातुन मला कळले की आम्ही डोंबिवलीला चाललो आहोत, लोकल ट्रेनने. मला किती आनंद झाला म्हणून सांगू!

का म्हणजे?

माझ्या आईने एक ठराव पास केला होता, मी एक वर्षाचा होईपर्यंत मला लोकलने कुठेही न्यायचे नाही. माझी आई काय ठरवेल सांगता येणार नाही. त्यामुळे मी आमची गाडी, रिक्षा, बस, घोडागाडी, विमान हे सगळ बघितलं होत पण लोकल काही पाहिली नव्हती.


आईला बरेचदा बाबांना सांगताना मी ऐकले होते की मी लोकलमधे हे कानातले घेतले, हा छोटा आरसा घेतला, आज कोणीतरी माझ्या पायावर पाय दिला, आज लोकलमधे असं झालं आणि आज लोकलमधे तसं झालं. त्यामुळे ही लोकल कोण आहे आणि ती एकटी हे सगळं कस करू शकते हे पहायची मला खूप उत्सुकता होती.


आम्ही एकदाचे स्टेशनवर पोचलो. कुपन्स पंच केली आणि प्लॅटफॉर्मवर जावून उभे राहिलो. मी सगळीकडे पहात होतो, नुसती माणसच माणसं होती सगळीकडे. आईने मला उचलुन घेतले होते. मधेच एक खूप मोठा आवाज आला, मी घाबरून आईला घट्ट धरून ठेवले. आमच्या पलिकडल्या प्लॅटफॉर्मवर एक गाडी थांबली ती एव्हढी लांब होती की तीची सुरुवात कुठुन झाल्ये आणि संपल्ये कुठे तेच दिसत नव्हते. मग आम्ही आधिपासूनच उभ्या असलेल्या एका तसल्याच लांब गाडीत जावुन बसलो. तेव्हा आई म्हणाली, शनु, या गाडीला लोकल ट्रेन म्हणतात. आता कळलं, लोकल एव्हढ्या सगळ्या गोष्टी एकटी कशी करते.














आम्ही बसलो ती लोकल एकदम रीकामी होती. मस्त खिडकीजवळच्या सीटवर बसलो होतो. बर्‍याच वेळानंतर आमची लोकल सुरू झाली. त्या लोकलमध्ये छोटी छोटी दुकानच होती. बागड्या, कानातले, पिनांचे दुकान. टिकल्यांचे दुकान. मग एक आजीबाई चिकू घेवुन आली टोपलीभर.


लोकल सुरू झाल्यावर छान वारा आला आणि आमची लोकल एकदम धाडधाड जात होती, मला जाम मज्जा वाटत होती. आजूबाजूच्या सगळ्या जणी माझ्याकडे बघून उगीचच हसत होत्या. गाडी मधे मधे थांबायची मग गाडीतल्या काही बायका खाली उतरायच्या काही गाडीत चढायच्या. मला एक प्रश्न पडला, की ड्रायव्हरला कसं बरोब्बर कळायचं की या सगळ्यांना कुठे उतरायचे आहे?


तसेच गाडीतली दुकानं पण सारखी बदलत होती, रुमालांचे दुकान पण होते तिथे. मग एक खाऊचे दुकान आले पॉपकॉर्न, वेफर्स, लिमलेटच्या गोळ्या, आवळासुपारी, जीरा गोळी, चॉकलेट्स, वगैरे. आईने श्रीखंडाच्या गोळ्या घेतल्या. मी कडकड चावून दोन-तिन गोळ्या खावून टाकल्या एकदम. मला आणखी खाऊ हवा होता पण आईने घेतला नाही.


आणखी एक स्टेशन गेले आणि खिडकीतल्या वार्‍याने मला मुळी झोपच यायला लागली. तसाच आईच्या मांडीत झोपुन गेलो. त्यामुळे मला डोंबिवली कधि आलं, रिक्षेत कधि बसलो आणि आत्याच्या घरी कधि पोचलो तेच कळलं नाही.

आई उगाच कंटाळते लोकलने जायला, मला तर लोकल ट्रेन खूप खूप आवडली, मज्जा येते लोकलमध्ये.

गुरुवार, मे २७, २०१०

लग्न आणि गाडी

मागचे दोन आठवडे खूप खूप बिझि गेले. ब्लॉगर्स स्नेहमेळावा संपल्यानंतर मी माझ्या मावशीच्या लग्नाच्या तयारीला लागलो.
आई सकाळी ऑफिसला गेली की आजी, रविनाताई आणि मी कामाला लागायचो. पापड केले, रंगित फेण्या केल्या, गव्हले बनवले. किती मजा आली मला. मी माझ्यापरीने त्यांना मदत करायचो जसे, पापडाची लाटी परत कुटणे, फेण्यांचा साबुदाणा चमच्याने ढवळणे, मी गव्हले चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करायचो पण ते यायचे नाहीत चिमटीत. खूपच छोटे होते ते. आजी लाडू वळायला बसली की मी लगेच चव बघायला तिथे हजर व्हायचो.
मी दुपारी झोपलो की आजी आणि रविनाताई करंज्या, अनरसे वगैरे माझी मदत नको असलेले पदार्थ करून घ्यायचे.
लग्नाच्या आदल्या दिवशी आई आणि मी मिळून रुखवतावर मांडायच्या सर्व पदार्थांचे नीट पॅकिंग केले. बॉक्समध्ये भरून पण ठेवले.










घरी पाहुणे आलेले सगळे माझे लाड करायचे, उचलून भूर्र न्यायचे, खाऊ द्यायचे त्यामुळे खूप मजा येत होती.
दुसर्‍या दिवशी म्हणजे मावशीच्या लग्नाच्या दिवशी सकाळी सव्वा पाच वाजता मी उठलो. दुदु पिउन झाल्यावर बाबांनी मला आंघोळ घातली. आईने मला लग्नासाठी खास शेरवानी ड्रेस आणला होता, त्याला छान ओढणी पण होती.

लग्नाचा हॉल एसी असल्यामुळे अजिबात गरमा झाला नाही. मी खूप हॉलभर मस्त हुंसडलो, खूप धमाल केली. रोजच्यासारखी दुपारची झोप पण काढली तिथे सोफ्यावर.

मावशीच्या लग्नात मी एक गंमत पाहिली. माझे होणारे काकांना लग्नमंडपात घेवून येताना एक वेगळेच वाद्य वाजवले त्या मिशीवाल्या काकांनी. आईने सांगितले त्याला तुतारी म्हणतात. मस्त आवाज यायचा त्याचा. मग मावशीला आणताना पण त्या काकांनी तुतारी वाजवुन वाजत गाजत मंडपात आणले. बाबांना आणि मला फार फार आवडली तुतारी.
मावशीच्या लग्नाची गडबड संपते ना संपते तो दुसर्‍या दिवशी अक्षयतृतीया आली. मला आत्याच्या नविन गाडीची डिलीव्हरी घ्यायला जायचे होते. तिथे सगळ्या फॉर्म्यालिटीज पूर्ण व्ह्यायला बराच वेळ गेला पण शोरूममध्ये एक मस्त छोटीशी घसरगुंडी होती, बॉल होता, छोटे टेबल आणि खुर्च्या होत्या. मी खूप मस्ती केली, खेळलो तिथे.
मग एका मोठ्या फुग्याला सायलीताईने टाचणी लावून फोडले, त्यातुन मस्त चकमक आणि थर्माकॉलचे छोटे बॉल पडले आमच्या अंगावर पडले. मोठ्या स्पिकरवर ’Congradulations' असे गाणे लावले आणि कारच्या कीज आम्हाला दिल्या.


आत्याने गाडीची पुजा केली, मग काजुकतली दिली सगळ्यांना, मी दोन खल्ल्या.
मग नविन गाडीने आम्ही आत्याला, काकांना आणि सायलीताईला डोंबिवलीला सोडून आलो.
नविन गाडीने आम्ही मस्त फिरायला पण जावून आलो पण त्याबद्दल मी पुढच्यावेळी लिहीन.

सोमवार, मे १०, २०१०

९ मे २०१० @ दासावा

दुपारी दोन ते चार ही माझी झोपेची वेळ आहे. त्यामुळे माझे कपडे कधी बदलले, रोहनदादाच्या गाडीत कसा बसलो आणि दासावा मधे केव्हा पोचलो ते कळलेच नाही. जाग आली तेव्हा दासावाच्या पायर्‍या चढत होतो बाबांच्या हातावर बसुन.



आम्ही साधारण सव्वाचारला पोचलो. तिथे दारातच महेंद्रकाका उभे होते, काही दादा आणि एक ताई पण होती कांचनताई. पण माझी त्याच्याशी ओळख नव्हती. त्यांनी मला बरोबर ओळखले. सचिनदादाने एक बॅच दिला आईला, नाव आणि नंबर लिहिलेला. मला पण बॅच हवा होता म्हणून आईने तो माझ्या शर्टला लावला.


आई, बाबा आणि मी पहिल्या रांगेत जाउन बसलो. मी लगेच एक बाटली दुदु पिउन घेतले, मला बरं वाटलं. आमच्याबरोबर रोहनदादाची बायको शमिका होती. तिच्या टच स्क्रिन फोनबरोबर मी खूप खेळलो. त्याच्यामुळे माझी आणि तिची चांगली मैत्री झाली.


हळुहळु सगळे यायला सुरुवात झाली. अमेरिकेची अपर्णाताई आली तिने मला खाऊ दिला आणि एक छोटीशी डबी दिली आहे पण त्यात काय आहे ते मला अजुन कळले नाहीये. मग श्रेयाताई आल्या त्यांनी एक गोळी देउन माझ्याशी दोस्ती केली.


थोड्या वेळाने मी आणि आई मागे गेलो जिथे पुण्याचा सागरदादा, हैद्राबादचा आनंददादा, भारतदादा, देवेंद्रदादा या सगळ्यांना भेटलो.


मधेच एक मुलगी आमच्या इथे आली आणि तिने माझा पापा घेतला. आईला वाटले कोणत्यातरी ब्लॉगरकाकांबरोबर आलेली त्यांची मुलगी असेल तर ती चक्क ’मैथिली थिंक्स’ हा ब्लॉग लिहीणारी माझी मैथिलीताई होती. मी माझ्या ब्लॉगचे विजेटकोड बनवुन देणार्‍या सलिलदादाला पण भेटलो. त्याला फोटोसाठी छान छान पोझ पण दिल्या.



कांचनताईने कार्यक्रमाला सुरुवात केली, स्वतःची ओळख करुन दिली. मग प्रत्येक जण आपापली माहिती सांगत होते. माझ्या मनातलं सगळं आईने सांगितलं. स्टेजवर असतानाच महेंद्राकाकांनी सगळ्यात ’लहान’ ब्लॉगर म्हणून मला एक ’मोठी’ कॅडबरी दिली. मला महेंद्रकाका खूप आवडतात.



थोड्या वेळाने बटाटेवडा कटलेट असा खाऊ आला. कटलेटचा तुकडा मी खाउन बघितला पण तिखट लागला मला म्हणून मी शमिकाच्या टच स्क्रिनबरोबर खेळायला गेलो. सगळे ताई, दादा, काका, आणि आजोबा स्वतःची ओळख करुन देत होते. आई ऐकत होती. मला जरा कंटाळा आला तेव्हा मी शमिका बरोबर मागे एक फेरी मारून आलो. महेंद्रकाकांच्या डिशमधला थोडासा बटाटावडा पण खल्ला. मला खुप मजा आली दासावामध्ये.


सगळ्यांना टाटा केला, फ्लाईंग किस दिला आणि आम्ही तिथुन थोडे लवकरच निघालो. येताना रोहनदादा बरोबर आल्यामुळे जाताना बसने घरी गेलो. विंडोसिट मिळाली होती मला मस्त झोप लागली. बसमधुन उतरुन आम्ही रिक्षेत बसल्यावर बाबांच्या लक्षात आले माझ्या एका पायात बुट नाहिये. आता कुठे शोधणार? बसमधे, रस्त्यात कुठे पडला कुणास ठाउक?

माझा आवडता बुट्टु हरवला :(

आई म्हणत होती सिंड्रेलाचा बुट्टु पण असाच हरवला होता आणि तो कोणीतरी शोधत शोधत तिला आणुन दिला, माझा पण बुट्टु असा कोणी परत आणुन दिला तर कित्ती बरं होईल.

सोमवार, एप्रिल २६, २०१०

काय वाट्टेल ते - भाग २

आईला तिच्या हातावर माझा छोटुसा हात असा फोटो काढायचा होता पण काहि केल्या माझी बोट सरळ राहीनात म्हणून मग त्या (काय वाट्टेल ते - भाग १) मधल्या पावलाच्या फोटोचा जन्म झाला.
माझ्या गळ्यात ह्या माळा घालुन आता काय बरं कारणार असतिल ही सगळी?
आता असे कोणाचे आंघोळ करताना फोटो काढावेत काय? तरी बरं पाण्यात तरंग उमटले नाहीतर.........
कधि कधि मी अशा पोझ पण देतो.



शुक्रवार, एप्रिल २३, २०१०

बू झाला

माझी ही पोस्ट आहे बिनाफोटोची. का? अहो फोटोग्राफर आणि फोटोविषय दोघही ढसाढसा रडत होते मग फोटो कोण काढणार?


थांबा थांबा असं मधुनच नको विस्ताराने सांगतो.


घरातली स्वयंपाकघर ही माझी सगळ्यात आवडती खोली आहे. आई जर काही बनवत असली तर मी जातीनं तिथे हजर असतो.


त्यादिवशी मी मस्त गिरकीचा खेळ खेळत होतो एका स्टिलच्या ५ किलोच्या डब्याशी. डब्याला एका बाजुला हाताने गोल फिरवायचं की तो मस्त गोल फिरतो. छान रमलो होतो मी. आई कढईत काहितरी ढवळत होती. बाबा खाली पार्किंगमध्ये गाडी पुसत होते. माझा खेळ चांगलाच रंगात आला होता, मी एक मस्त मोठी गिरकी दिली डब्याला आणि ’ढाम्म्म्म्म्म’ झालं. एक सेकंद मला कळलच नाही. माझा उजव्या पायाचा अंगठा. पाच किलोचा मोठा स्टिलचा डबा माझ्या उजव्या पायाच्या बोटाच्या अंगठ्यावर. आई जोरात ओरडली आणि मी जोरात भोकाड पसरले.


माज्या अंगठ्याच्या नखामागची स्किन थोडीशी निघाली आणि रक्त येत होते. मला खूप दुखत पण होते आणि आपल्याला काहितरी झाले याची मला भिती पण वाटत होती. हे काय झालं माझ्या पायाला? मी ओक्साबोक्शी रडत होतो. आई मला उचलुन हॉलमध्ये घेवुन गेली. आता मी आईच्या मांडीत झोपुन रडत होतो. आई माझ्या पायाला काहितरी लावण्याचा प्रयत्न करीत होती. मला सांगत होती ’शनु, रडु नको, मी औषध लावते’ पण मी तिला माझ्या पायाला हातही लावुन देत नव्हतो. अजुन जोरात रडणे सुरु केले ते पाहुन मग आईला पण रडु यायला लागले.


तेव्हढ्यात बाबा दार उघडून आत आले, स्वयंपाकघरातुन धुर येत होता, आई आणि मी रडत होतो हे सगळं पाहुन त्यांना समजेना नक्की काय झालयं. जिथुन धुर येत होता तिकडे म्हणजे किचनमध्ये जावुन त्यांनी गॅस बंद केला. मग आमच्याकडे वळुन म्हणाले , काय झालं? तुम्ही दोघं का रडताय?


आई म्हणाली, स्टिलचा डबा आर्यनच्या पायावर पडला. बाबांनी विचारले, मग तु का रडत्येस?
कारण त्याच्या पायाला लागलयं, रक्त येतयं म्हणून. मी त्याच्याकडे लक्ष द्यायला हवं होतं नीट.


छे! ही तर सुरुवात आहे, मोठा झाल्यावर बघ किती धडपडेल तो! हे तर काहीच नाही. सोफ्रामायसिन लाव आणि दुदु पण दे त्याला प्यायला. बाबांनी मला उचलुन घेतले आणि आईने दुदु आणुन दिले प्यायला. हळुच औषध पण लावले.


दुदु संपल्यावर मी भोकाड पसरणार तेव्हढ्यात बाबा म्हणाले, चला बाईकवरुन कोण भुर्र येतय फिरायला. माझी लगेच होकारार्थी मान हलायला लागली मग माझे रडणे आपोआप कमी झाले.


जाताना बाबा आईला म्हणाले आता काळ्याकुट्ट रव्याचा उपमा तर बनु शकत नाही तेव्हा मस्त गजाननचा वडापाव आणतो आपल्याला, आईल पण हसायला आले. मी आणि बाबा मस्त बाईकवरुन फिरुन आलो. मला लागलय हे मी विसरुन पण गेलो.


खाताना बाबा म्हणत होते मगाशी तुमचा दोघांचा फोटो काढायला हवा होता एकत्र रडताना आणि दोघही खूप हसले. नंतर कित्येक दिवस मी बू कुठे झाला म्हटलं की उजव्या पायाच्या अंगठ्याकडे बोट दाखवत असे.


आता कळलं, माझी ही पोस्ट बिनाफोटोची आहे कारण, मला "बू झाला"