आईबरोबर सगळे खादाडीचे ब्लॉग वाचताना एक गोष्ट जाणवली सगळे जण खाऊच्या पदार्थांचे फोटो टाकतात, कृति कशी करायची ते सांगतात, कुठल्या हॉटेलात मिळेल ते पण सांगतात. पण खायचा कसा ते सांगत नाहीत की फोटोत दाखवत पण नाहीत. म्हणून आज मी ते काम करणार आहे.
हा फोटो पहा, मी माझा आवडता ’टोमॅटो सॉस’ खात आहे. मला सॉस एव्हढा आवडतो की प्लेटमधे ’टोमॅटो सॉस’ सोडून दुसरा कोणताच पदार्थ नाहीये. तसेच बरोबर अख्खी सॉसची बाटली ठेवली आहे. म्हणजेच आवडत्या पदार्थाचा मनमुराद आस्वाद घ्यावा. खाताना तो पदार्थ आपल्या बोटांना, तळहाताला, ओठांच्या बाजुला, स्वत:च्या कपड्यांना, फरशीला, आजुबाजुच्या वस्तूंना, माणसांना लागला तरी हरकत नाही. घरातली माणसं स्वत:सकट सगळ्यांना स्वच्छ करतात.
कोणताही पदार्थ वाया घालवू नका. आई म्हणते, शनू, फरशीवर पडलेली वस्तू तोंडात घालू नको. धुळ आणि किटाणू लागतात त्याला, आजारी पडायला होतं. मी ते मानत नाही, तोंडातून पडलेली बडीशेपची गोळीसुद्धा मी परत चिमटीने उचलून तोंडात भरतो. कारण मी ती गोळी जर टाकून दिली तर मुंगी ती गोळी खाते. जर खाली पडलेली गोळी खाऊन मुंगीला काही आजार होत नाही तर मला कसा होईल? पण अजुन बोलता येत नसल्याने मी हे आईला विचारू शकत नाही.
मला डीशमधे खायला दिलेले चुरमुरे तर मी मुद्दामुन खाली ओततो. मग पंख्याच्या वार्याने ते सगळ्या घरभर उडतात, त्यांना शोधून शोधून पकडून खाताना खूप मज्जा येते आणि वेळ पण चांगला जातो.
मी सगळे खाऊ डाव्या व उजव्या दोन्ही हातांच्या बोटांनी खातो, असे केल्याने कमी वेळात जास्त खाऊ खायला मिळतो. चमचा मी फक्त पोट भरले असेल आणि खायचा कंटाळा आला असेल तर ताटलीतल्या खाऊत खेळायला वापरतो. कारण ताटलीतला पदार्थ चमच्यात उचलून तोंडापर्यंत नेइस्तोवर अर्ध्या रस्त्यात कुठेतरी पडून जातो आणि आई समोर असेल तर तो पडलेला खाऊ ताटलीत परत पण येत नाही. मुंग्यांना खायला मिळतो उगाचच.
आई जेव्हा खाऊ डीशमधे काढून देत असते तेव्हा त्या खाऊची जागा नीट बघून ठेवायची म्हणजे स्वत:ला जेव्हा हवा असेल तेव्हा त्या जागेकडे, डब्याकडे बोट दाखवून, मान हलवून हलवून तो खाऊ मिळवता येतो.
हॉटेलमध्ये गेल्यावर नेहेमी सगळ्या खाऊंची चव बघायची, कारण आई बाबा मागवतात ते सगळे खाऊ खूप छान असतात. मला तिखट लागेल म्हणून माझ्यासाठी नेहेमी साधा डोसा मागवला जातो पण मी थोडासा डोसा खाऊन, आई बाबांच्यातले पण खातो. त्यांनी दिले नाही तर जोरात रडतो. मग आपोआप मला पाहिजे ते मिळते. पण चुकुन शेजवान न्युडल्स असतिल तर मात्र जाम वाट लागते. खोकला लागतो, नाक डोळे लाल लाल होतात, नाकातुन पाणी येते. पण एक बरं, आईच्या पर्समधे नेहेमी एक साखरपाण्याची बाटली असते माझ्यासाठी.
रात्री जेवण झाल्यावर लगेच झोपायचे नाही. नाहीतर रव्याचा लाडू, नारळाची वडी, आंब्याचे साठ, चॉकोलेट केकची पेस्ट्री, आईसक्रीम अगदी काही नाही तरी सफरचंद, केळं ही फळे यांसारखे उत्तमोत्तम पदार्थ खायचे राहून जातात. हा परवाचा माझा फोटो पहा, चॉकोलेट लाव्हा खातानाचा,


तुम्हा सगळ्यांना पण असाच छान छान खाऊ खायला मिळो!